Breaking News

कोरोनानंतर शाळा सुरू होताना…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तब्बल पंधरा महिन्यापासून शाळा बंद आहेत. शास्त्रज्ञांच्या संशोधनाला मिळालेल्या यशानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसी निघालेल्या आहेत. 18 वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध झाली असून, मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू आहे. मात्र अजूनही आपली 18वर्षाखालील बालके लसीपासून वंचित आहेत.

कोरोना काळात शाळा बंद असल्याने, मुलांनी फक्त आपल्या आई, वडील व कुटुंबियांसोबत एकत्र घालवलेला कालावधी विचारात घेण्यासारखा आहे. कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार बुडाले, कारखाने बंद पडले, व्यापार ठप्प झाला. त्याचा प्रत्यक्ष परिणाम मानव जीवनावर झाला. पण आपली खरी हानी झाली आहे ती म्हणजे आपल्या बालकांचे भविष्य. कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद झाली. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची  परिणामकारकता दिसून येण्यासाठी विविध अनुभवांची आवश्यकता असते. तसे अनुभव कोरोना काळात मुलांना क्वचितच अनुभवायला मिळाले.

शाळा तसेच शासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यात बर्‍यापैकी किमान विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात ठेवता आले. मात्र त्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण, स्वाध्याय, गोष्टींचा शनिवार या व अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला. पण जोपर्यंत शिक्षक-विद्यार्थी, विद्यार्थी-विद्यार्थी, विद्यार्थी- पालक यांच्यामध्ये आंतरक्रिया होत नाही, तोपर्यंत शिक्षण प्रक्रियेला गती येणार नाही. म्हणूनच, प्रत्यक्ष शाळा उघडणे व शिक्षक-विद्यार्थी यांच्यात आंतरक्रिया घडणे अतिशय आवश्यक आहे.

लवकरच शाळा सुरू होतील व ज्ञानदानाचे पवित्र कार्य पूर्ववत सुरु होईल. हे होत असताना शिक्षकांसमोर काही आव्हाने उभी राहणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुलांमधील शारीरिक मानसिक तणावाचा समावेश आहे.

कोरोनामुळे मोठ्या कालावधीसाठी टाळेबंदी असल्याने मुलांना घरातील बंद खोलीतच दिवस काढावे लागले. यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. काहींमध्ये व्यायामाचा अभाव व सतत काही तरी खात राहिल्याने स्थूलता, लठ्ठपणा यासारखे शारीरिक विकार दिसून येत आहेत. सतत टीव्ही व मोबाइलच्या वापरामुळे मुलांना त्यांचे व्यसन लागल्यासारखे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध एखादी क्रिया घडल्यास मुले चिडचिड करताना दिसून येत आहेत. मुले सतत घरातच राहिल्याने मानसिक ताण, तणाव वाढत आहे. वडिलधार्‍यांची कामे ऐकताना मुलांमध्ये कंटाळा वाढला आहे. ऑनलाइन अभ्यासाच्या नावावर मुले मोठ्या प्रमाणात मोबाइलशी जोडली गेली आहेत. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त विविध प्रकारचे मोबाइल गेम्स (फ्री फायर, पब्जी यासारखे आत्मघात करणारे खेळ) खेळताना मुले दिसून येत आहेत. त्यातून मुलांमध्ये रागीटपणा, स्वार्थीवृत्ती, गुन्हेगारी, चिडचिडेपणा यासारख्या भावनांना खतपाणी मिळत आहे. तसेच तहान भूक हरपून निव्वळ मोबाइल खेळण्याच्या नादात मुलांचे शारीरिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिघडताना दिसून येत आहे. अशा वातावरणातून मुले जेव्हा शाळेत येतील, तेव्हा थेट अध्ययन-अध्यापन प्रक्रियेकडे न वळता मुलांना मुक्तपणे शालेय वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी विविध मैदानी खेळ तसेच वृक्षारोपण, रंगकाम, बडबड गीते, कागद काम अशा पूरक कृतींचा प्रामुख्याने शाळेत सराव व्हायला हवा. काही कालावधीनंतर अध्ययन-अध्यापनास सुरुवात करावी लागणार आहे.

आरोग्य तपासणीची गरज

बरीच बालके वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी किंवा विकारांनी ग्रस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा शाळा सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांची तात्काळ शालेय आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. यामध्ये शिक्षकांनी बारकाईने प्रत्येक विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून कान, नाक, डोळे यांच्याशी निगडित विविध चाचण्या घेऊन दोष शोधावेत. मोठ्या प्रमाणात टिव्ही, मोबाईलचा वापर केल्यामुळे मुलांमध्ये अंशत: अंधत्व, दृष्टिदोष, डोळ्यातून पाणी येणे, अस्पष्ट दिसणे अशा समस्या वाढू शकतात. या समस्या दूर होण्यासाठी त्यावर तात्काळ उपाय होणे आवश्यक आहेत. यामुळे मुले आनंदाने अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभागी होतील.

बालमजुरी

शाळा बंद असल्याने पालकांच्या व्यवसायात मदत म्हणून किंवा घरी उपासमारीला बळी पडू नये या कारणाने दहा ते चौदा वयोगटातील बरीच मुले बालमजूरीकडे वळलेली आहेत.  खेड्यातील मुले शेती, शेळी पालन, गुरे चारणे, मासेमारी करणे, भाजीपाला विक्री, फळ विक्री अशा छोट्या छोट्या व्यवसायांमध्ये गुंतली आहेत. शाळा बंद असल्याने व रोज नगदी पैसे मिळत असल्याने या मुलांमध्ये शिक्षणाबद्दल उदासीनता आलेली आहे. तसेच पालकांनाही चार पैसे मिळत असल्याने व शिकून कुठे नोकरी लागणार आहे, अशा नकारात्मक विचाराने बर्‍याच मुलांचे पुढील शिक्षण खंडित होण्याची शक्यता आहे. अशा वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी व्यक्ती, शिक्षकांनी जाणीवपूर्वक अशा पालकांचे समुपदेशन करून शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे.

बालविवाह

शिक्षण खंडित झाल्यामुळे मोठा परिणाम मुलींच्या शिक्षणावर झालेला आहे. कोरोना महामारीचे कारण पुढे करत खेड्यातील पालकांनी आपल्या कोवळ्या वयातील मुलींचे लग्न लावून देण्यास सुरुवात केली आहे. लग्न कमी खर्चात व मोजक्या लोकांमध्ये होत असल्याने एकाचे पाहून दुसर्‍याने आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकली व मोठ्या कर्जातून मुक्त झाल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र या बालविवाहातून जन्माला येणारे मूल कुपोषित होण्याचे प्रमाण खूप आहे. तसेच आईच्या जीवितास मोठ्या प्रमाणात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम समजावणे तसेच जनजागृती करणे हे ही मोठे आव्हान सर्वांपुढे आहे. त्यात शिक्षकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

कोरोनामुळे शिक्षकही आपले कार्य नियमितपणे करू शकले नाहीत. तेव्हा शाळा सुरू होताना शिक्षकांनी शैक्षणिक कार्याला अधिक गतिमान केले पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होईल व समाजात शिक्षकांबद्दल असणारे गैरसमज दूर होतील.

-जगदिश जाधव, प्र. मुख्याध्यापक, जगापूर, जि. यवतमाळ

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply