दुकानदारांना ‘पॉस’ ठरतेय डोकेदुखी
मुरूड : प्रतिनिधी
पॉस मशीनमध्ये ऑनलाइन धान्य वितरणाचा डेटा न टाकल्यामुळे मुरूडमधील रेशन दुकांनातून शिधापत्रिकाधारकांना तीन आठवडे उलटून गेले तरीही ऑगस्ट महिन्याचे धान्य मिळालेले नाही. त्यामुळे जनतेमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुरूड शहरात चार रेशन दुकाने असून या दुकानातून दर महिना शहरातील सर्व शिधापत्रिकाधारकांना पॉस मशीनव्दारे धान्य वाटप केले जाते, मात्र गेल्या काही दिवसापासून कळंबोली (पनवेल) येथील एफसीआय येथून पॉस मशीनमध्ये ऑनलाइन धान्य वितरणाचा डेटा न टाकल्यामुळे मुरूडमधील रेशन दुकानांतील धान्य वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे रेशन दुकानात हेलपाटे मारूनही शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळेनासे झाले आहे. आगस्ट महिना संपावयास काही दिवस शिल्लक राहिले आहेत, तरीही मुरूडमधील शिधापत्रिकाधारकांना अजूनही या महिन्याचे धान्य मिळालेले नाही. सार्वजनिक सुट्ट्यांमुळे या महिन्यांचे धान्य मिळणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
एफसीआयच्या कळंबोली येथील कार्यालयातून पॉस मशीनमध्ये ऑनलाइन धान्य वितरणाचा डेटा न टाकल्यामुळे रेशन दुकानातून धान्य वाटप होत नाही. येत्या दोन तीन दिवसांत या समस्येचे निराकरण होऊन धान्य वाटप सुरळीत होईल.
-सचिन राजे, अव्वल कारकून, पुरवठा शाखा, मुरूड
शिधापत्रीकाधारकांना वितरीत करण्यासाठी मुरूड तालुक्यातील सर्व दुकानांमध्ये धान्य जमा झाले आहे. मात्र पॉस मशीनमध्ये धान्य वितरणाचा डेटा न टाकल्याने धान्य वितरण करता येत नाही.
-गिरीश साळी, अध्यक्ष, मुरुड तालुका स्वस्त धान्य वितरण संघटना