Monday , February 6 2023

गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा!

संभाजीराजे ठाकरे सरकारवर संतापले

कोल्हापूर : प्रतिनिधी

नांदेडमध्ये मराठा समाजाकडून मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात कोविक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरुन भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे.

गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर का? समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळ न्याय, असे का?, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

संभाजीराजेंनी यासंदर्भात एक ट्विट केले असून या ट्विटमध्ये मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची प्रतदेखील ट्विट केली आहे. नांदेड येथे शुक्रवारी मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक मोर्चाची हाक देण्यात आली होती. खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पार पडले. हा लॉकडाऊन नंतरचा मराठा आरक्षणाचा पहिलाच मूक मोर्चा आहे. या वेळी संभाजीराजे छत्रपतींनी आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजाची भूमिका मांडली तसेच मराठा आरक्षण मंजूर करण्यासाठी त्यांना काही पर्यायही सुचवले होते.

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यासाठी इथे आलो नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचार सांगायला आलोय. जर माझे ऐकायचे असेल, तर आपण बोलूच. माझे फोटो काढून काहीच उपयोग नाही. किती फोटो काढायचे?, असे संभाजीराजे म्हणाले होते.

दरम्यान, नांदेड येथे सकल मराठा समाज व विविध संघटनांच्या वतीने आयोजित मूक आंदोलनात संभाजीराजेंनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले मराठा समाजाने 58 मोर्चे काढून समाजाच्या भावना व्यक्त केल्या असून आजपर्यंत आम्हीही बोललो आहोत, आता लोकप्रतिनिधींनी समाजासाठी काय केले, हे सांगण्याची वेळ आली आहे. राज्य सरकाकडून आरक्षणाबाबत टोलवा-टोलवी केली जात आहे, उपसमितीच्या अध्यक्षांनी समाजाची दिशाभूल करू नये, असा टोलाही संभाजीराजे भोसले यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता लगावाला होता.

मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या मूक आंदोलनाकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठ फिरवली होती. उपसमितीचे अध्यक्ष असणार्‍या नांदेडच्या सुपुत्राने दिल्लीत काँग्रेस, शिवसेनेच्या तसेच अन्य पक्षांच्या खासदारांच्या भेटी घेतल्या, त्यांना मला भेटण्यास वेळ नाही, असे म्हणत संभाजीराजेंनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply