उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
कोरोना पार्श्वभूमीवर लागोपाठ दुसर्या वर्षी उरण तालुक्यातील करंजा गावात होणारा नारळी पौर्णिमा उत्साहाचा जल्लोश उरणकरांना अनुभवता आला नाही. द्रोणागिरी हायस्कूलमधून निघणारी नारळाच्या प्रतिकृतीची मिरवणूक निघालीच नाही, परंतु नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाच्या प्रतिकृतीची विधिवत पूजा करून नारळ समुद्राला आर्पण करण्यात आला.
गेल्या 20 वर्षापासून नारळीपौर्णिमेचा उत्सव द्रोणागिरी हायस्कूलमध्ये साजरा केला जात आहे. विद्यार्थी पारंपरिक कोळी वेशभूषेमध्ये उत्सवात सहभागी होऊन आपल्या कोळी संस्कृतीचे दर्शन घडवितात. नंतर नारळाच्या प्रतिकृतीची मिरवणूक निघते. समुद्र किणार्यावर मिरवणूक पोहचल्यानंतर विद्यार्थी, माजी विद्यार्थी पारंपरिक नृत्य सादरीकरण होते. नंतर मोठ्या भक्तिभावाने प्रतिकृतीचे पूजन होऊन नारळ नौकेतून समुद्राला अर्पण केला जातो, परंतु कोरोना महामारीमुळे या वर्षी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी सालाबादप्रमाणे वृक्षांना महिला व विद्यार्थिनींनी राखी बांधली. नंतर इतर सर्व कार्यक्रम रद्द करून नारळाच्या प्रतिमेचे पूजन करून नारळ गाडीतून समुद्रावर नेला व तेथून होडीमध्ये खोल समुद्रात नेऊन त्याचे अर्पण करण्यात आले.
या वेळी विद्यालयाचे चेअरमन सीताराम नाखवा, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन भालचंद्र कोळी, विद्यालयाचे व्हा. चेअरमन के. एल. कोळी, माजी चेअरमन शिवदास नाखवा, माजी उपसरपंच प्रदीप नाखवा, मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक ए. टी. पाटील, इंग्रजी माध्यमाच्या प्रिन्सिपल प्रभू, सोसायटीचे सदस्य, स्कूल कमिटीचे सदस्य, सदस्या, ग्रामस्थ व शिक्षकवर्ग उपस्थित होते.