पनवेल : रामप्रहर वृत्त
नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा महत्त्वाच्या सणांपैकी एक सण आहे. याचे औचित्य साधून रविवारी (दि. 22) पनवेलमधील कोळी वाडा येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तसेच कोळी बांधवांनी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला व नारळ समुद्राला अर्पण केला. या वेळी कोळीगीते आणि ढोलताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रामध्ये नारळ अर्पण करून कोळीबांधव पासाळ्यामध्ये बंद असलेल्या मासेमारीला पुन्हा सुरुवात करतात. त्यामुळे पनवेल कोळीवाडा परिसरातील कोळीबांधवानी कोळीवाड्यातून पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने आनंदात मिरवणूक काढली. कोळीबांधवानी बोटीची पूजा केली. छान रंगरंगोटी केलेल्या बोटी मासेमारीसाठी समुद्रात लोटण्यात आल्या. त्याचबरोबर पावसाळ्यात समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा प्रतिकात्मक नारळ अर्पण करण्याच्या परंपरेनुसार नारळ अर्पण करण्यात आला. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, मदन कोळी, नगरसेविका रुचिता लोंढे, माजी नगरसेविका सुनंदा पाटील आदी उपस्थित होते.