गोकुळाष्टमी किंवा गोपाळकाला हे मुंबई परिसरातील चाकरमान्यांच्या जीवनातले महत्त्वाचे दिवस, तेच हरपून गेले आहेत. तरीही महाविकास आघाडीला अजूनही पाझर फुटत नाही. कोरोनाच्या तिसर्या लाटेची भीती दाखवून यंदाही मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांना परवानगी नाकारली आहे. साहजिकच त्यामुळे सामान्य मराठी जनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे होतील. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या वादाला मात्र तोंड फुटले आहे.
दोन वर्षे होऊन गेली, चाकरमान्यांच्या मुंबईमध्ये गोविंदांची पथके फिरली नाहीत. दहीहंडीचा जल्लोष दिसला नाही. ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम या ढोलकीच्या तालावर गोविंदा पथके थिरकली नाहीत. खरे तर, जन्माष्टमी किंवा गोपालकाला हे दोन्ही दिवस देशभर उत्साहाने साजरे केले जातात. कृषी संस्कृतीतून निर्माण झालेल्या सणावारांच्या परंपरेचा गोकुळाष्टमी हा अविभाज्य भाग आहे. मनासारखा पाऊस झाल्यानंतर पेरण्या आटोपल्या की शेतकर्यांना थोडीशी उसंत मिळत असे. त्या काळात श्रावणातील व्रतवैकल्ये, दहीहंडी आणि गणेशोत्सवासारखे सणवार साजरे होत असत. ही परंपरा युगानुयुगे चालत आली आहे. दहीहंडीच्या सणाशी मुंबईकरांचे मात्र वेगळे नाते आहे. पोटासाठी कोकणातून मुंबईत येऊन स्थायिक झालेल्या चाकरमान्यांसाठी हा सण विशेष महत्त्वाचा असतो. गेले दीड वर्ष कोरोनाने कहर केल्यामुळे गोविंदा पथके घरोघरी बसून राहिली. मुंबईत आणि आसपासच्या परिसरात अनेक छोट्यामोठ्या दहीहंड्या लावल्या जात असत. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर झालेली असत. गोविंदांचा उत्साह दृष्ट लागण्यासारखा असे. सध्या कोरोनाची साथ बर्यापैकी आटोक्यात आलेली असल्यामुळे यंदा तरी महाविकास आघाडी सरकार दहीहंडी साजरी करण्यास परवानगी देईल असे वाटले होते, परंतु ती अपेक्षा फोल ठरली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची दृष्टी सत्ता मिळाल्यानंतर पूर्णपणे उफराटी झाली असावी, असे वाटू लागले आहे. आघाडीच्या नेत्यांच्या जंगी सभा कोरोना पसरवत नाहीत. शिवसेनेचे युवक मेळावे कोरोनामुक्त असतात. उद्घाटन समारंभ अतिशय सुरक्षित वातावरणात पार पाडले जातात, परंतु दहीहंडी उत्सवामुळे मात्र लगेच कोरोना पसरतो असा साक्षात्कार महाविकास आघाडीला केव्हापासून झाला? भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह अनेकांनी दहीहंडीवर निर्बंध लादण्याच्या सरकारी निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे, ती काही उगाच नव्हे. हिंदू सणवार आले की ताबडतोब कोरोनाची भीती घातली जाते. अन्य राजकीय कार्यक्रम मात्र सुखनैव पार पडतात. हा दुटप्पीपणा आता महाराष्ट्राच्या सार्या जनतेने ओळखला पाहिजे. किंबहुना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खुर्चीला खुर्ची लावून बसल्यानंतर शिवसेनेमध्ये झालेले परिवर्तन आश्चर्यकारक आहे. हाच पक्ष एकेकाळी मुंबईतील मराठी माणसाचे धडाडीने प्रतिनिधित्व करत होता. मुंबईकर मराठी लोकांची अस्मिता जागी ठेवत होता यावर विश्वास बसत नाही. वास्तविक लसींचे दोन्ही डोस पूर्ण केलेले गोविंदाच दहीहंडी उत्सवात सहभागी होतील, उत्सवाच्या ठिकाणी सामाजिक अंतराचा नियम कसोशीने पाळला जाईल असे गोविंदा मंडळांतर्फे सरकारला सांगण्यात आले होते. त्यांची आर्जवे अखेर महाविकास आघाडी सरकारच्या बहिर्या कानांवर पडली. तिसर्या लाटेचा बागुलबुवा दाखवून सत्ताधार्यांनी लादलेली दडीहंडीबंदी शिवसेनेला आगामी निवडणुकीत महाग पडू शकते, याची जाणीव जरी ठेवली असती तरी बरे झाले असते. कोरोनाच्या नावाखाली आघाडी सरकारने वाजवलेली डबलढोलकी आता थांबवावी एवढीच अपेक्षा आहे.