नवीन बांधकाम उद्घाटना अगोदरच समस्यांनी ग्रासले
उरण : वार्ताहर
नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उद्घाटनाअगोदरच भग्नावस्थेत पडून आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे 85 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही इमारत खराब झाली आहे. त्यामुळे शासनाकडून खर्च करण्यात आलेला 85 लाखांचा निधी वाया जातो की काय असा प्रश्न उरणच्या जनतेला पडला आहे.
सागरी किनारपट्टी भागातून होणारे दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने किनारपट्टीवरील सागरी पोलीस ठाण्याना विशेष महत्त्व प्राप्त करून दिले आहे. त्या अनुषंगाने मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरा, करंजा बंदर आणि घारापुरी परिसरावर नजर ठेवण्यासाठी शासनाने नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या हद्दीत नव्याने मोरा सागरी पोलीस ठाण्याची निर्मिती केली. या पोलीस ठाण्यासाठी सुसज्ज इमारत असावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उरण शहरातील पेन्शन पार्क येथील भूखंडावर शासनाकडून प्राप्त झालेल्या 85 लाख निधीतून सुसज्ज इमारतीचे बांधकाम 2018 ते 2020 या वर्षात हाती घेण्यात आले.
या पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली आहे. त्यात शहरात उद्भवणार्या पुर परिस्थितीचे पाणी या इमारतीच्या तळमजल्यावर साचून राहते. एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे उद्घाटनाअगोदरच ही इमारत भग्नावस्थेत पडून राहिली आहे. तरी राज्यातील जनतेचा पैसा वाया जातो की, काय अशी चर्चा सध्या उरणात रंगू लागली आहे.
राज्य शासनाने मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठी 85 लाखांचा निधी 2018 मध्ये मंजूर करून दिला, परंतु इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली असून अनेक समस्यांनी ग्रासली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करावी व इमारतीच्या बांधकामासाठी वाया जात असलेला निधी शासनाने अभियंता व या ठेकेदारांकडून वसूल करून घ्यावा.
-जयवंत कोळी, माजी सरपंच, हनुमान कोळीवाडा
मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामासाठी 85 लाखांचा निधी मंजूर झाला होता, परंतु इतर काम हे निधी अभावी रेंगाळत पडलेले आहे. शासनाकडून निधी मंजूर झाला की उर्वरित काम हाती घेतले जाणार आहे.
-एस. बी. बांगड, उप अभियंता, सा. बां. विभाग, उरण