मुरूडमधील बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण
मुरूड : प्रतिनिधी
तालुका सुपारी खरेदी विक्री संघाने यंदा सुपारीला प्रति मण 6400 रुपये भाव जाहीर केल्याने मुरूडमधील बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुरूड तालुक्यात सुपारी लागवडीचे क्षेत्र 450 हेक्टर असले तरी उत्पादन क्षेत्र 399 हेक्टर इतके आहे. तालुक्यातील आगरदांडा, शिघ्रे, नांदगाव, चिकणी, भोईघर, काकळघर, मांडला, बोर्ली, मजगाव, काशीद, माझेरी आदी ठिकाणी सुपारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र निसर्ग चक्रीवादळात सुमारे 142 हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्याने सुपारीचे उत्पन्न 50 टक्क्यांनी घटले.
मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघातर्फे दरवर्षी बागायतदारांकडून सुपारीची खरेदी केली जाते. सुपारी संघाचे चेअरमन महेश भगत यांनी यंदा सुपारीला प्रति मण 6400 रुपये भाव जाहीर केला आहे. मागील वर्षी सुपारीला प्रति मण 4120 रुपये इतका भाव देण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा दोन हजारापेक्षा जास्त दर मिळाल्याने बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोरोना काळात मंदी असतानाही सुपारीला भाव मिळवून दिल्याबद्दल नांदगाव येथील बागायतदार विद्याधर चोरघे यांनी मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाचे आभार मानले.
वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये साडेसहा टक्के दलाली व कमिशन द्यावे लागत होते. मात्र सुपारी संघाने वेबसाईट तयार केल्यामुळे थेट बाजारपेठ मिळाली. त्यामुळे बागायतदारांना वाढीव भाव देणे शक्य झाले आहे.
-महेश भगत, चेअरमन, मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघ