मुरूड : प्रतिनिधी
पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या मुरूड तालुक्यातील रस्त्यांची सध्याची अवस्था पाहता या वर्षीही बाप्पांचा मार्ग खडतरच आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आधीच कोरोनामुळे कोमात गेलेल्या येथील पर्यटन व्यवसायाची अवस्था तर बुडत्याचा पाय खोलात अशीच झाली आहे.
मुरूड ते साळाव या सुमारे सात कोटीच्या मंजूर रस्त्याचे काम रखडले आहे. नांदगावच्या दांडे भागातील रस्त्याची एक बाजू नादुरुस्त आहे. विहुर ते नांदगाव बाजारपेठेपर्यंतचा रस्ता खड्ड्यातच गेला आहे. बोर्ली स्थानकाजवळील खड्डे तर वाहन चालक व प्रवाशांचा अंत पाहताहेत. आगरदांडा ते इंदापूर रस्ता दिघी पोर्टसाठी कॉक्रीटचा बनवला गेला असला तरी मुरूड ते आगरदांडा रस्ता खड्डेमयच आहे. मुरुड ते रोहा मार्गावरील उसरोली ते कोकबन हा सुपेगाव खिंड रस्ता एकेरीच असून त्याचे संरक्षक कठडे गेली अनेक वर्षे ढासळलेलेच आहेत.
मुरूड नगर परिषद हद्दीतील रस्त्यांची अवस्थाही वाईटच आहे. शहरातील जुनी पेठ, दस्तुरी नाका, भोगेश्वर पाखाडी, सबनीस आळी, अंजुमन हायस्कूल रस्ता आदी रस्त्यांची दैना उडाली असून गणेशोत्सवापूर्वी ते दुरूस्त करण्यात येतील असे मुख्याधिकारी गोविंद कौटुंबे यांनी स्पष्ट केले आहे.
मुरुडमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत रस्तेही भरपूर आहेत.त्यातील बहुतांशी रस्ते खड्डेमयच आहेत. बोर्ली स्थानक ते बोर्ली गाव हा रस्ता कधीच धड बनवला गेला नाही. अन्य गावांना जोडणारे व गावातील रस्त्यावरून चालणेही मोठ्या जिकरीचे होते. जुलै व ऑगस्ट महिन्यात येथे झालेल्या तुफानी वृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच रस्ते पार धुपून गेले आहेत. अनेक मोर्या ढासळल्या आहेत. पुल कमकुवत झाले आहेत.
नादुरुस्त रस्त्यांमुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनता मेटाकुटीस आली आहे. मात्र बांधकाम खात्याकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळा संपताच रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.