टोकियो ः वृत्तसंस्था
भारताची टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोकियो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. यंदाच्या या स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण देशाला ही भेट दिली आहे.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अंतिम फेरीत 34 वर्षीय भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा 3-0 असा पराभव केला. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविनाचे फोनवरून अभिनंदन केले.
भारताच्या खात्यात आणखी दोन पदके
टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतासाठी रविवारचा दिवस विशेष ठरला. एका दिवसात भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य आणि एक कांस्य अशी मिळून एकूण तीन पदके जिंकली. टेबल टेनिसपटू भाविना पटेलने दिवसाची सुरुवात रौप्यपदकाने केली, तर सांयकाळ अखेरीस निषाद कुमारने उंच उडीत रौप्य आणि विनोद कुमारने थाळीफेकमध्ये कांस्यपदक जिंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचेही अभिनंदन केले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …