पनवेल : बातमीदार
राज्य उत्पादन शुल्क विभाग, पनवेल शहर, पनवेल ग्रामीण आणि भरारी पथकाने संयुक्तरीत्या राबविलेल्या मोहिमेत कर्जत तालुक्यातील बेकरे या गावाच्या हद्दीतील दारूच्या निर्मिती केंद्रावर छापा टाकून अंदाजे दोन लाख किमतीच्या गावठी दारूच्या रसायनांची विल्हेवाट लावली आहे. कर्जत तालुक्यातील बेकरे या गावामध्ये गावठी दारू तयार होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाचे वामन चव्हाण (ग्रामीण), अविनाश रणपिसे (शहर), भरारी पथकाचे एस. गोगावले यांनी व त्यांच्या पथकाने बेकरे सर्व परिसर पिंजून काढला. पाऊस व झाडीमुळे गावठी दारूच्या शोध मोहिमेत अडचणी निर्माण होत होत्या. बेकरे या गावाच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या हातभट्टीच्या गावठी दारूच्या निर्मिती केंद्रावर छापा टाकला व अंदाजे एक लाख 98 हजार 800 रुपये किमतीच्या आठ हजार लीटर गूळ व नवसागर मिश्रित रसायनचा नाश केला आहे.