Breaking News

क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठेल

 मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचा विश्वास

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
सबका साथ, सबका विकास यासोबतच सबका प्रयास या सूत्राच्या आधारे क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठू शकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते रविवारी (दि. 29) मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी लाल किल्ल्यावरून भाषण देताना म्हणालो होतो सबका प्रयास. सर्वांच्या प्रयत्नांनीच भारत क्रीडा क्षेत्रात नवीन उंची प्राप्त करू शकेल. मेजर ध्यानचंद यांच्यासारख्या लोकांनी जो मार्ग दाखवलाय त्यावरून पुढची वाटचाल करण्याची जबाबदारी आपली आहे.
‘मन की बात‘च्या 80व्या भागात पंतप्रधानांनी ऑलिम्पिक, स्टार्ट अप, भारतीय संस्कृती अशा विविध विषयांवर चर्चा केली तसेच क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची रविवारी जयंती होती. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी त्यांचे स्मरण करून म्हणाले, संपूर्ण जगामध्ये भारताच्या हॉकीचा डंका वाजवण्याचे काम मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीने केले होते. आज चार दशकांनंतर जवळजवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आजच्या नवतरुणांच्या दृष्टीने लक्ष्य नवे, शिखरही नवे आहे आणि त्यासाठी स्वीकारला जाणारा मार्गही नवा आहे. एकदा का मनाने निश्चय केला केला की, युवक अगदी आपले सर्वस्व पणाला लावून निश्चयपूर्तीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेतात.
या कोरोना कालखंडामध्ये स्वच्छतेविषयी मला जितके काही सांगायचे, बोलायचे होते ते थोडे कदाचित कमी झाले असावे, असे वाटतेय, परंतु स्वच्छता अभियानाकडे आपल्याला जराही दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
‘मन की बात’चे पनवेलमध्ये थेट प्रक्षेपण
पनवेल ः दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधतात. त्या अंतर्गत पनवेल शहरातील भाजपचे मध्यवर्ती कार्यालय, मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सभागृह आणि के. गो. लिमये वाचनालय येथे ‘मन की बात’च्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप कार्यालयात पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल; श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ; तर के. गो. लिमये वाचनालयात भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पटवर्धन, नगरसेविका रूचिता लोंढे, गुरूनाथ लोंढे, सांस्कृतिक सेलचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी, बुथ कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply