Breaking News

माथेरानच्या रग्बी हॉटेलमधील कामगारांना पाच महिने पगार नाही

पुन्हा कामावर घेण्यासदेखील टाळाटाळ

कर्जत : बातमीदार

रिलायन्स ग्रुपच्या माथेरानमधील रग्बी हॉटेल मध्ये 10 वर्षे नोकरी करणार्‍या 25 आदिवासी कामगारांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाही. कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमध्ये कामावर येऊ नका, असे हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना सांगितले, पण आता या कामगारांना हॉटेलच्या गेटवरसुध्दा उभे राहू दिले जात नाही. हॉटेल व्यवस्थापनाच्या  या आडमुठ्या भूमिकेमुळे हे आदिवासी कामगार संतापले असून, त्यांनी न्यायासाठी धावाधाव सुरू केली आहे.            

रिलायन्स ग्रुपच्या या ‘द रग्बी हॉटेल’ मध्ये माथेरानच्या पायथ्याशी आसलेल्या आदिवासी वाड्या आणि गावातील 25 तरुण पडेल ते काम करतात. ते रोज सकाळी कामाच्या ठिकाणी येतात आणि रात्री उशिरा डोंगर उतरून घरी जातात.

मालक महेंद्र ठक्कर यांनी हे रग्बी हॉटेल रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीजला विकले आहे. हॉटेल आता केवळ रिलायन्स ग्रुपच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशिवाय कोणालाही राहण्यास दिले जात नाही. ठक्कर यांच्याकडून विकत घेतल्यानंतर हे हॉटेल काही वर्षे बंदच होते. मात्र केवळ कामगार तेथे स्वच्छता राखण्याचे काम करीत होते. लॉकडाऊन काळात या कामगारांना हॉटेल व्यवस्थापनानेे घरी राहण्यास सांगितले. आता अनलॉकमध्ये हे सर्व कामगार पुन्हा कामावर कधी येऊ, हे विचारण्यासाठी गेले. मात्र सुपरवायजर तुकाराम बावदाणे यांनी, त्यांना ‘बोलावल्याशिवाय येऊ नका, तुम्हाला पगार दिला जाईल’ असे सांगून तेथून पिटाळून लावण्याचे काम केले आहे. मात्र हॉटेल प्रशासनाने त्यांना मागील पाच महिन्याचा पगार अद्याप दिला नाही आणि त्यांचा रोजगारदेखील हिरावून घेतला आहे.

या कामगारांनी आपल्याला न्याय द्यावा यासाठी कर्जत तालुका आदिवासी संघटनेकडे धाव घेतली आहे. आता आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते कशाप्रकारे न्याय देतात?याकडे लक्ष लागून राहिले आहे.

रिलायन्स ग्रुप कंपनीचे कंपनी अफेअर ऑफिसर संतोष विचारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनीवरून बोलण्याचे टाळले तर त्यांना एसएमएस करून आदिवासी तरुणांच्या कामांबाबत आणि पगाराबाबत माहिती दिली. त्या एसएमएसलादेखील त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply