पनवेल : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका सज्ज होत आहे. विसर्जनासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चार प्रभागांतील 63 ठिकाणी सोय करण्यात आली आहे. यामध्ये विसर्जन घाट, तलाव यांच्या स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी नुकतीच या ठिकाणांची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. गणेशोत्सवाला येत्या 10 तारखेला सुरुवात होणार असून दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनानुसार महापालिकेकडून व्यवस्था करण्यात येत आहे, तसेच मागील वर्षाप्रमाणे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून गणपती विसर्जन करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पनवेल शहरातील प्रभाग ‘ड’मधील बल्लाळेश्वर गणेश विसर्जन घाट, प्रभाग क्रमांक 19 कोळीवाडा पक्की गणेश विसर्जन घाट, तक्का गणपती विसर्जन घाट या गणेश विसर्जन घाटाची साफसफाई करण्यात आली आहे, तसेच प्रभाग ‘क’ कामोठे मधील सेक्टर 14 मधील शंकर मंदिर विसर्जन घाट, जुई गाव विसर्जन घाट, सेक्टर 34 कृत्रिम तलाव विसर्जन घाट, सेक्टर 6 मधील जुही रेसिडेन्सी विसर्जन घाट येथील स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत कळंबोलीमधील सेक्टर 12, टेंभोडे, वळवली, खिडुकपाडा गाव, वालदेश्वर मंदिर, प्रभाग क्रमांक 10 मधील कळंबोली गाव स्मशानभूमीजवळ, शंकर मंदिर लगत, प्रभाग क्रमांक 16 मधील आदई तलाव येथे गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. त्या पार्श्वभूमीवर या विसर्जन तलावांची साफसफाई करणे, तलावाजवळील गवत व कचरा काढण्याची कामे सुरू केली आहेत. प्रभाग समिती ‘अ’ खारघरमध्ये पापडीचा पाडा, मुर्बी गाव, सेक्टर 14 मधील खारघर तलाव, खुटूकबांधण आदी ठिकाणी स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय इतरही विसर्जन ठिकाणांच्या स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहेत. बांधकाम विभागाच्या वतीने विसर्जनाच्या ठिकाणी कृत्रिम तलावांची सोयदेखील करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या वतीने लोखंडी टाक्या, प्लास्टिक टाक्या त्या त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.