खोपोली : प्रतिनिधी
खोपोली नगर परिषद हद्दीत शिळफाटा येथे पाताळगंगा नदीकाठी नानानानी पार्कचा प्रस्ताव वाढत्या अतिक्रमणामुळे रखडणार असून, नव्याने पदभार घेतलेले मुख्याधिकारी अतिक्रमण विषय किती गांभीर्याने घेणार याकडे खोपोली नागरिकांचे लक्ष लागले आहे. दोन वर्षापूर्वी खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा चौक रस्त्याचे रुंदीकरण हाती घेण्यात आले होते. रस्ता रुंद होणार याकरिता दुकानदारानींही सहकार्याची भूमिका घेत चार ते पाच फूट जागा सोडली. दुकानाच्या विरुद्ध बाजूला रस्त्यालगत असलेल्या टपर्यादेखील या वेळी हटवण्यात आल्या होत्या.
तत्कालीन खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दुकानदारांच्या सहकार्याचे आभार मानत मोकळ्या झालेल्या टपर्यांच्या जागी नानानानी पार्क तयार करण्यात येईल, असे सांगितले होते, परंतु त्यानंतर शिंदे यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी गणेश शेटे आले, पण त्यानंतर कामाचा वेगदेखील कोरोनामुळे मंदावला. त्यामुळे नानानानी पार्क उभे राहत नसल्याने मोकळ्या जागेवर पुन्हा टपर्या, चिकन दुकाने थाटली असून परिसर विद्रूप झाला आहे. स्थानिकांनी नगर परिषदेत तक्रार देऊनही अतिक्रमण विरोधात कारवाई झालेली नाही. मुख्याधिकारी गणेश शेटे यांचीही बदली झाली असून नवीन मुख्याधिकारी यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे अतिक्रमण विषय ते कसा हाताळणार याकडे स्थानिक नागरिक लक्ष ठेवून आहेत.