पनेवल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात ‘स्वच्छ भारत’सर्वेक्षण 16 ते 22 ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येत आहे. त्यानुसार माझी वसुंधरा अभियानांतर्गत कचरा विलगीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याकरिता ‘स्वच्छता का उपहार’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘स्वच्छता के दो रंग हरा गिला, सुखा निला’ या उपक्रमाची बचत गटाच्या महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने बुधवारी (दि. 19) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, एनयुएलम विभाग प्रमुख विनया म्हात्रे, उपायुक्त सचिन पवार, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि महापालिका क्षेत्रातील बचत गटांचे सुमारे 200 हून अधिक महिला उपस्थित होते. उपायुक्त कैलास गावडे यांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्या आपण शिवू शकतो. बचत गटांच्या महिलांनी याकडे व्यवसायाची संधी म्हणून पहावे, असे आवाहन केले. सचिन पवार यांनी ओला व सुका कचर्याच्या वर्गीकरणाविषयी जनजागृती करणे, कापडी पिशव्या तयार करणे अशा पर्यावरणाविषयी संबधित कामांमध्ये महापालिकेस सहकार्य करण्यास सांगितले. सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी बचतगटाच्या महिलांना ओला व सुका कचरा वर्गीकरणाविषयी माहिती दिली. तसेच कंपोस्ट खत कसे तयार करावे याबाबत एक माहितीपट दाखविला. यासोबतच प्लास्टिक दुष्परिणामाची माहिती त्यांनी दिली, प्लास्टीकच्या दुष्परिणामावरील शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली.