Breaking News

कर्जतमधील गणेशघाटांची पालिकेकडून पाहणी

कर्जत : बातमीदार

कर्जत शहरातील गणेश विसर्जन उल्हास नदीवर ज्या ज्या गणेश घाटांवर केले जाते, तेथील सोयीसुविधांची पाहणी आणि अत्यावश्यक सेवा यांची माहिती घेण्यासाठी कर्जत नगर परिषदेकडून पाहणी करण्यात आली.

कर्जत शहरातील गणेश विसर्जन उल्हास नदी पात्रात वाहत्या पाण्यात केले जाते. गौरी-गणपती, तसेच अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी येणार्‍या बाप्पावर पालिकेकडून शामियाना उभारून पुष्पवृष्टी केली जाते. उल्हास नदीच्या तीरावर वसलेल्या कर्जत शहरात अनेक ठिकाणी गणेश विसर्जन केले जाते. तेथील महावीर पेठ, तसेच आमराई दहिवली येथील गणेश विसर्जन घाटांवर भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोणत्याही  गैरसोयी होऊ नये यासाठी नगर परिषदेकडून नियोजन केले जाते. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरातील गणेश विसर्जन वादात सापडले होते. आता त्या चुका होऊ नये यासाठी कर्जत नगर परिषदेकडून शहरातील कर्जत, दहिवली, मुद्रे, गुंडगे येथील गणेश विसर्जन घाटांची पाहणी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केली. या वेळी नगर परिषदचे आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, विद्युत अभियंता लाड, तसेच नगर अभियंता मनीष गायकवाड आदी सोबत होते.

शहरातील गणेश घाटांची पाहणी केल्यानंतर नगराध्यक्ष जोशी आणि मुख्याधिकारी पाटील यांनी कर्मचारी अधिकारी वर्गाला गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणार्‍या विसर्जन सोहळ्याबाबत सूचना केल्या, तसेच आवश्यक सोयीसुविधांची यादी तयार करून त्यानुसार नियोजन केले जाणार आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply