मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीतील विहूर रौद परिसरात तणावाचे वातावरण असताना शनिवारी (दि. 11) सकाळी 11.30 वाजता येथील तैजून नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या
मर्जीने ड्रोनचा वापर केला. हा ड्रोन त्याने त्याच्या जागेवतिरिक्त इतर जागेतही फिरवल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सरकारी गुरुचरण असलेली जागा तैजून यांनी विकत घेतल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व मालकामध्ये वाद निर्माण होऊन येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तैजूनने गावकर्यांचा विरोध मोडून तीन दिवस पोलीस संरक्षण घेऊन जलदगतीने वॉलकंपाऊंडचे काम पूर्ण केले.
आता शांतता असतानाच अचानकपणे ड्रोन वापरून ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. तैजून यांच्या हस्तकाने ग्रामस्थांना चिथावणी देण्याकरिता गावातील घरांवर काही वेळ ड्रोन उडवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोन उडवण्यासंबंधी काही नियमावली जाहीर केली आहे. नियम मोडल्यास लाखो रुपयाचा दंड वसूल करण्याची तरतूद आहे. मग सर्व नियम विहूर ग्रामस्थांनीच पाळायचे का, असा संतप्त प्रश्न सध्या विहूर ग्रामस्थांनी केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर ग्रामस्थांनी मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांना बेकायदेशीर ड्रोन उडवल्याची खबर दिली होती, परंतु याबाबत आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांना ड्रोनबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, याबाबत ग्रामस्थांनी मला तोंडी कल्पना दिली आहे. रीतसर तक्रार अर्ज आल्यावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.