उरण : वार्ताहर – उरण शहरात भटक्या कुत्र्यांचा (श्वान) नागरिकांना त्रास होत असे विशेषता वृद्ध नागरिकांना, महिलांना, लहान मुले, दुचाकी वाहने चालक आदींना भटक्या कुत्र्यांमुळे जास्त त्रास होत असे या गंभीर समस्यांचा विचार करून उरण नगरपरिषद यांनी भटक्या कुत्र्यांसाठी (श्वान) निर्बीजीकरण व लसीकरण केंद्राची उभारणी केली आहे. हे केंद्र व नगरपरिषद कार्यालया मागे असून या केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (दि.2) उरण नगरपरिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, गटनेते रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, आरोग्य सभापती तथा नगरसेविका रजनी कोळी, नगरसेवक नंदकुमार लांबे, नगरसेवक राजेश ठाकूर, धनंजय कडवे, मेराज शेख, नगरसेविका यास्मिन गॅस, जानव्ही पंडीत, दमयंती म्हात्रे, अभियंता झुंबर माने, उद्यान निरीक्षक महेश लवटे, जसीन गॅस, जगदीश म्हात्रे, हरेश जाधव, संजय दाते, सचिन नांदगावकर, प्रकाश मोरे, हेमंत भोंबळे व उरण नगरपरिषद कर्मचारी आदी उपस्थित होते.
या केंद्राचे काम मायवेट्स चॅरिटेबल ट्रस्ट अॅण्ड रिसर्च सेंटर या एजन्सीला देण्यात आले असून त्यामुळे या गंभीर समस्येला मात करता येणे शक्य होणार आहे. श्वान पकडल्यानंतर त्याला कुठलीही इजा होऊन देता त्याला रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे व निर्बीजीकरण करण्याच्या शस्त्रक्रिया करण्या आगोदर श्वानास चार ते पाच दिवस आधी अॅडमिट केले जाणार आहे. त्यामध्ये औषधोपचार, श्वानाची योग्य देखभाल व योग्यतो आहार दिला जाईल. चार ते पाच दिवसांत श्वानास पूर्ण तंदुरुस्त झाल्या नंतर ज्याभागातून श्वान पकडून आणले असतील त्याभागातच सोडले जातील.
या उपक्रमामुळे श्वानांची संख्या नियंत्रणात राहणार असून भटक्या कुत्र्यांचा त्रास भविष्यात निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी माहिती उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे नागरिक कौतुक करीत आहेत.