Breaking News

राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ?

हवामान खात्याची माहिती; मच्छीमारांना किनार्‍यावर परतण्याचा इशारा

मुंबई ः प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे, तर काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाली. आता राज्यात एक नवे संकट उभे ठाकले आहे. येत्या चार दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. त्यामुळे अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना किनार्‍यावर परत येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

एकीकडे अवकाळी पावसाचा धोका असताना आता राज्यासमोर नवे संकट निर्माण झाले आहे. बुधवारपासून अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणार्‍या लोकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे, तसेच अरबी समुद्रात मच्छीमारांसोबत अन्य बोटींना लवकरात लवकर किनारपट्टीवर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 15 मेच्या आसपास काही दिवस मच्छीमारांनी अरबी समुद्र, मालदिव, कोमोरीन, लक्षद्वीप आणि केरळ किनारपट्टीच्या समुद्री भागात फिरकू नये, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

सध्या मालदिव, लक्षद्वीप, अरबी समुद्रात मासेमारीसाठी किंवा पर्यटनासाठी जे समुद्रात गेले आहेत, त्यांनी 12 मेच्या रात्रीपर्यंत किनारपट्टीवर परतण्याची गरज आहे. त्यानंतर समुद्रातील हालचाली धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे 14  मेच्या रात्रीपासून केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्रासह गोवा किनारपट्टीवरील भागात राहणार्‍या लोकांनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

तसेच 14 आणि 15 मे रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह तामिळनाडू आणि कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता आहे. एकीकडे राज्याला कोरोनाने ग्रासले असताना  अवकाळी पाऊस आणि आता चक्रीवादळाच्या स्थितीमुळे राज्यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply