Breaking News

रायगडातील जनताच तटकरेंना नेस्तनाबूत करेल -ना. अनंत गीते

अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर

मी काय कामे केली याचा जाब विचारण्याचा अधिकार सुनील तटकरे यांना नाही. माझी कामे रायगडातील जनतेला माहीत आहेत. तटकरेंनी काय केले हेदेखील जनता ओळखून आहे. त्यामुळे येत्या 23 एप्रिल रोजी जनता मी केलेल्या कामांची पोचपावती देईल आणि तटकरेंना या निवडणुकीत पराभूत करून राजकीय पटलावरून नेस्तनाबूत करेल, असा विश्वास रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दै. ‘रामप्रहर’शी बोलताना व्यक्त केला.

आपण निष्क्रिय खासदार आहात, अशी टीका विरोधक करीत आहेत, त्यावर आपले मत काय, या प्रश्नाला उत्तर देताना ना. गीते म्हणाले की, मी निष्क्रिय आहे की मी काम केले हे रायगडातील जनतेला माहीत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अडले होते. ते व्हावे यासाठी मी प्रयत्न केले आहेत. या मार्गासाठी जमिनी मिळवून देण्यात पुढाकार घेतला. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणात योगदान दिले.

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी प्रयत्न केले. पेण-अलिबाग रेल्वे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याला रेल्वे मंत्रालयाने मान्यताही दिली आहे. हे सारे रायगडातील जनतेला माहीत आहे. त्यामुळे विरोधक काय बोलतात याची मला पर्वा नाही.

आपले नाव रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाही व आपण एकदाही मतदान केले नाही, हा विरोधकांनी प्रचाराचा मुद्दा केला आहे, यावर बोलताना ना. गीतेंनी सांगितले की, विरोधकांच्या या टीकेची मी अजिबात दखल घेणार नाही. त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून ते हा मुद्दा प्रचारात घेत आहेत. ही लढाई सदाचार विरुद्ध भ्रष्टाचाराची आहे. त्यामुळे जनता भ्रष्टाचार्‍याला पराभूत करेल आणि सदाचाराला निवडून देईल.

या वेळी शेतकरी कामगार पक्ष पूर्ण ताकदीनिशी तटकरेंच्या पाठीशी उभा आहे. काँग्रेसचे नेते त्यांच्या प्रचारात फिरत आहेत. याचा आपल्या मतदानावर काय परिणाम होईल, या प्रश्नाला उत्तर देताना ना. गीतेंनी म्हटले की, ही केवळ नेत्यांची आघाडी आहे. मतदारांची व कार्यकर्त्यांची आघाडी झालेली नाही. हे सर्व वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. जनतेला ते पटलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मी एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येईन.

सुनील तटकरेंचा पराभव निश्चित आहे, परंतु त्यांच्यासोबत गेलेल्यांनादेखील जनता धडा शिकवणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याची संधी रायगडच्या जनतेला मिळणार आहे. सुज्ञ जनता ते काम योग्य प्रकारे करेल, असेही ना. गीते यांनी शेवटी नमूद केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply