मुंबई : प्रतिनिधी
महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 13) पत्रकार परिषदेत केला. याबाबत सोमय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकार्यांकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमय्या यांनी सांगितले की, मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. नावेद मुश्रीफ यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँडरिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून दोन कोटींचे, तर मरुभूमी फायनान्स अॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीकडून 3.85 कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते आहे. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. श्रीमती सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख 78 हजार 340 शेअर्स आहेत. 2003 ते 2014 या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. याबाबत मंगळवारी मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे खा. किरीट सोमय्या यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, 2700 पानांचे पुरावे त्यांना देणार आहे. परवा दिल्लीला अर्थविभाग, ईडी, कंपनी मंत्रालय इथे देखील हे पुरावे मी सादर करणार आहे. ठाकरे सरकारच्या डर्टी घोटाळा 11 मध्ये राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे 2 मंत्र्यांच्या फाईल तयार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. आज एनसीपीच्या एका मंत्र्याचा घोटाळा उघड केला आहे. काही दिवसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचा देखील घोटाळा उघड करू, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी शेवटी दिला आहे.
कसा होतो घोटाळा?
या प्रकरणांमध्ये नेमका घोटाळा कसा होतो, हे देखील किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. समजा, एखाद्याकडे जर करप्शनचे पैसे आले, तर तो रोख पैसे ऑपरेटरला देतो. शेल कंपन्यांचे ऑपरेटर असतात. या प्रकरणात प्रवीण अगरवाल आहेत, भुजबळांच्या केसमध्ये जैन म्हणून होता. त्यांना आपण कॅश देतो. ही कॅश घेतल्यानंतर शेल कंपनी ऑपरेटर त्यांची लेअर बनवतात. आधी एका कंपनीत टाकतात. मग त्या कंपनीतून चेक घेऊन दुसर्या कंपनीत करतात. मुश्रीफांच्या प्रकरणात नाविदच्या खात्यात सीआरएम कंपनीने दोन कोटींचा चेक दिला. सीआरएमच्या खात्यात तो चेक अजून एका लेअरवाल्या कंपनीतून आला. त्या कंपनीमध्ये कॅश भरली गेली. सगळ्यात शेवटी ती कॅश कुणाला मिळाली, ते पाहायचे असते, असे सोमय्या म्हणाले.
2700 पानी पुरावे!
मी राज्य सरकारमधील 11 भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती, पण दुर्दैवाने 11 जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे 2700 पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावावर जमा झालेल्या रकमा
मरुभूमी फायनान्सकडून 15.90 कोटी
नेक्स्टजेन कन्सल्टन्सीकडून 35.62 कोटी
युनिव्हर्सल ट्रेंडीं एलएलपीकडून 4.49 कोटी
नवरत्न असोसिएट्सकडून 4.89 कोटी
रजत कन्झ्युमर सर्व्हिसेसकडून 11.85 कोटी माऊंट कॅपिटलकडून 2.89 कोटी