Breaking News

गणेशोत्सवातही ‘दिबां’च्या नावाचा गजर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी भूमिपुत्र ठाम

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. लाडक्या गणरायाची पूजा-अर्चा करतानाच महामुंबई परिसरातील भूमिपुत्र त्यांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावाचाही गजर करीत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव देण्यात यावे या भूमिकेवर स्थानिक प्रकल्पग्रस्त ठाम असून अनेकांनी लोकनेते दि. बा. पाटील विमानतळाची प्रतिकृती देखाव्यात साकारली आहे.
पनवेल परिसरात होत असलेल्या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे ही सन 2008पासूनची भूमिपुत्रांची मागणी असताना राज्यातील ठाकरे सरकारने अचानक शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे रेटले आहे. त्यामुळे रायगड, ठाण्यासह मुंबई, पालघर, नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले असून त्यांनी ‘दिबां’चेच नाव विमानतळाला देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून 10 जून रोजी झालेले भव्य मानवी साखळी आंदोलन, 24 जूनचे विराट सिडको घेराव आंदोलन तसेच 9 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या विशाल मशाल मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या तिन्ही एल्गारात आगरी, कोळी, कराडी, कुणबींसह विविध समाजांचेही लोक होते. विशेष म्हणजे बाहेरून महामुंबईत वास्तव्यास आलेले अन्य जाती-धर्मीय, तसेच अमराठी भाषिकदेखील ‘दिबां’चे कार्य ज्ञात झाल्यावर एकवटले होते.  
एकीकडे मैदानात लढाई सुरू असताना दुसरीकडे राज्य सरकारशी वाटाघाटी सुरू होत्या, मात्र या सरकारने त्याची दखल न घेतल्याने सर्वपक्षीय कृती समितीने केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कृती समितीने केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमवेत केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. त्या वेळी मंत्रीमहोदयांनी समितीच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. आता राज्य सरकारने विमानतळ नामकरणाबाबत पुनर्विचार करून ‘दिबां’ना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. त्याचे प्रतिबिंब यंदा गणेशोत्सवातही उमटले.
पनवेल, कल्याण, भिवंडी, बदलापूर व इतर ठिकाणच्या प्रकल्पग्रस्त गणेशभक्तांनी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाने देखावे उभारले आहेत. यामध्ये विमानतळ, आजूबाजूचा परिसर, स्थानिकांच्या पाऊलखुणा साकारण्यात आल्या आहेत. जोडीला ‘दिबां’वरील गीते अस्मिता जागवत आहेत. या देखाव्यांचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांना पसंती मिळत आहे. 

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply