Breaking News

पनवेलमध्ये गौरी-गणपतींच्या विसर्जनस्थळी चोख व्यवस्था

पनवेल : प्रतिनिधी
पनवेलमध्ये गौरी-गणपतींचे मंगळवारी (दि. 14) भावपूर्ण वातावरणात नियोजनबद्धरीत्या विसर्जन करण्यात आले. महापालिका कार्यक्षेत्रातील कळंबोली, कामोठे, पनवेल, तळोजा या चारही प्रभागात एकूण 11 हजार 027 गणपतींचे विसर्जन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे गणेशभक्तांना विसर्जनाच्या वेळी कोणतीही समस्या उद्भवली नाही. महापालिका क्षेत्रात एकूण 68 ठिकाणी गणेशभक्तांच्या सोयीसाठी चोख उपाययोजना करण्यात आली होती. यामध्ये कृत्रिम तलाव, विद्युत व्यवस्था, मंडप, बॅरिगेटिंग, गणेश मूर्तीची नोंदणी, निर्माल्य कलशाची सोय करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायजेशन, हॅन्डवॉश, गर्दी होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने अग्निशमन दल, वाहतूक विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा व आरोग्य विभाग, तसेच पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता. ऑनलाइन टाईम स्लॉट बुकिंग प्रणाली अंतर्गत 60 ठिकाणी घराजवळील मूर्ती विसर्जनाची स्थान व वेळ निश्चित करण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले होते. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी नगरसेवक नितीन पाटील, विक्रांत पाटील, अनिल भगत, नगरसेविका रूचिता लोंढे, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल आदी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply