पनवेल : प्रतिनिधी
पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नियंत्रणाखाली प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी नुकतीच पनवेल शहरात अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाई केली.
गीतांजली सोसायटी देशी दारू दुकानासह 13 दुकाने तसेच धोकादायक इमारतीत असणारे गाळे सील करण्यात आले. सर्व्हिस हौदामागे स्टेशन रोडवर 15 भंगार दुकाने निष्कासित करण्यात आली. गुणे हॉस्पिटलसमोर पाच पत्राशेड व दोन अनधिकृत गाळे तोडण्यात आले. अनेक वर्षांपासून ही अनधिकृत दुकाने येथे उभी होती. याबाबत महानगरपालिकेने संबंधितांच्या विरोधाला न जुमानता ही कारवाई केली.
या वेळी ‘ड’ प्रभागाचे 15 कर्मचारी व सात पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित होते. अखेर कोणताही विरोध न होता ही कारवाई पूर्ण करण्यात आली. ही कारवाई अशीच सुरू राहणार, असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.