Sunday , February 5 2023
Breaking News

किराणा घराण्याच्या गायिका डॉ. प्रभा अत्रे

गुरु चरण नित लाभो प्रभो, मांगत एकहि दान तुम्हीसो प्रभो

नाद समिंदर अतहि कठिण, पार उतरु कैसे गुरु बिन प्रभो

किराणा घराण्याच्या अष्टपैलू गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखंच आहे. तरीही एक शिष्या म्हणून मी माझ्या गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते.

विज्ञान आणि कायदा या दोन विषयांतील पदवीधर असलेल्या प्रभाताईंचं संगीत क्षेत्रात फार मोठं योगदान आहे. त्यांचं प्राथमिक संगीत शिक्षण विजय करंदीकर यांच्याकडे झालं. त्यानंतर किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक सुरेश बाबू माने यांची तालीम त्यांना मिळाली. सुरेशबाबूंच्या अकाली निधनानंतर त्यांच्या भगिनी पद्मभूषण हिराबाई बडोदेकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या एकाच वेळी 11 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा झाला होता. आजवरची ही या क्षेत्रातील जगातील मोठी नोंद आहे. स्वरांगिनी, स्वरंजनी, सुस्वराली, अंतःस्वर, स्वरमयी, स्वराली, सुस्वरात्री,Enlighting Of The Music, Along The Path Of Music अशी

बंदिशी, कविता व लेखनाची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

डॉ. प्रभा अत्रे यांना विशेष करून कर्नाटकी राग गायची खूपच आवड आहे. ज्याप्रमाणे त्याचे हिंदुस्तानी रागांवर प्रभुत्व आहे त्याचप्रमाणे कर्नाटकी रागांवरही तेवढेच प्रभुत्व आहे. अपूर्व कल्याण, मधुरकंस, मोहनकंस, हरीकंस, दरबारी कंस, भिन्नकंस, पटदीप मल्हार, भूप कल्याण, रविभैरव, कौशिक भैरव, तिलंग भैरव, कलाहिर, शिवकाली, शिवानी, भिमवंती हे व असे अनेक राग डॉ. प्रभाताईंनी निर्माण केले.

गुरुशिष्य परंपरेतील या घराणेदार शिक्षणानंतर स्वतःची प्रतिभा, चिंतन, मनन, अखंड साधनेच्या बळावर प्रभाताईंनी संगीत क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केला. त्यांनी नागपूर आकाशवाणी केंद्रात संगीत दिग्दर्शक आणि मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठात संगीत विभाग प्रमुख म्हणून काम केले. भारत सरकारने प्रभाताईंना पद्मश्री, पद्मभूषण, टागोर पुरस्कार, कालिदास सन्मान, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार यांसारखे सन्मान प्रदान केले आहेत.

माझे वडील रामचंद्र गुंडोदेसाई  यांच्याकडे मोठमोठे गायक, वादक कलाकार येत असत. डॉ. प्रभाताईही आमच्या घरी यायच्या. त्यांची साधी राहणी, सोज्वळ व्यक्तिमत्त्व, संगीत क्षेत्रातील योगदान, प्रभावी गायन, शिस्तबद्ध आयुष्य या सार्‍यांचा माझ्या मनावर खूपच प्रभाव पडला, आणि मनोमन ठरवलं की गुरू असावा तर असाच.

विद्यादानाचं पवित्र कार्य करीत असताना प्रभाताईंना वेळेचं भान कधीच नसतं. हातचं काहीही राखून न ठेवता त्या संपूर्ण अखंडपणे ज्ञान शिष्यांच्या पदरी घालत असतात. विद्यार्थ्यांना त्या भरभरून देतात, एकेक सूर, तान अगदी घोटून घेतात. प्रभाताईंनी आज 90 वर्षे पूर्ण केली, पण आजही त्यांचा स्वच्छ व खडा स्वर कानी पडला, तर त्यांचे वयही कळत नाही! अशा गुरूंकडून मला संगीताचे धडे मिळाले व अजूनही मिळत आहेत.

मी 1996 साली शांताराम संगीत विद्यालय सुरू केले. त्यानंतर 10 वर्षांनी स्वरमयी गुरुकुलाची शाखा म्हणून माझ्या शांताराम संगीत विद्यालयाची घोषणा केली. शांताराम संगीत विद्यालयाला स्वरमयी गुरुकुलाची शाखा होण्याचा बहुमान आणि आयुष्यातील तो बहुमुल्य क्षण शब्दात व्यक्त करू शकत नाही असाच आहे.

डॉ. प्रभा अत्रे यांच्या 90व्या जन्म दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांच्या श्रृंखलेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या माध्यमातून आगामी एक वर्षभर प्रत्येक रविवारी सकाळी 11 वाजता यू-ट्यूब चॅनलवर स्वरयोगिनी डॉ. प्रभाताई अत्रे यांचेच शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, ध्वनिमुद्रित कार्यक्रमांचे प्रसारण केले जाणार आहे. त्यासोबतच किराणा घराणा ग्रंथालय स्थापित केले जाणार आहे, जिथे संगीत रसिक, विद्यार्थी आणि संगीत शिक्षक सगळ्यांनाच एकाच ठिकाणी किराणा घराण्यातील आजवर होऊन गेलेल्या आणि असलेल्या गायक कलाकारांचा इतिहास, त्यांचे ध्वनिमुद्रण, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची छायाचित्रे हे सारे उपलब्ध होणार आहे. या ग्रंथालयात डॉ. प्रभाताई अत्रे त्यांची सारी पुस्तके, ध्वनिमुद्रण, इतिहास, छायाचित्रेही उपलब्ध होणार आहेत. या ग्रंथालयासाठी मी कर्नाटकातील धारवाड, हुबळी, गदग या ठिकाणचे ज्येष्ठ गायक पं. सोमनाथ मरडूर, कुमार मरडूर, अर्जुनसा नाकोड, प्रख्यात तबलावादक रघुनाथ नाकोड व त्यांची धर्मपत्नी रेणुका नाकोड यांच्या मुलाखती व ध्वनिमुद्रण, छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्यासाठी विश्वनाथ नाकोड यांची खूपच मदत झाली. पं. कैवल्य कुमार गुरव यांचे शिष्य विजयकुमार पाटील यांनी 1920 पासूनचे जेवढे किराणा घराण्याचे गायक आहेत, त्यांचे ध्वनिमुद्रण देण्याची तयारी दाखवली आहे. धारवाडमधील पं. बसवराज राजगुरू यांच्या पाच सीडी व काही पुस्तके लायब्ररीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

मला मुलीसमान मानणार्‍या माझ्या गुरुमाऊली डॉ. प्रभा अत्रे यांच्या 90व्या जन्मदिनी स्वरमयी गुरुकुल फाऊंडेशन द्वारा किराणा घराणा ग्रंथालय आणि पूर्ण वर्षभर  त्यांच्या ध्वनिमुद्रित कार्यक्रमांचे प्रसारण या दोन अमूल्य भेटी त्यांना देत आहोत.

डॉ. प्रभाताईंच्या 90व्या जन्मदिनी त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो आणि त्यांचे मार्गदर्शन आम्हा शिष्यांना अखंड लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

-वीणा कुळकर्णी, संचालिका, शांताराम संगीत विद्यालय

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply