Breaking News

आजी, माजी आणि भावी..!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण

औरंगाबाद ः प्रतिनिधी
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 17) औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद इमारतीच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हेही उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, असा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांनी या वेळी उपस्थित मान्यवरांना संबोधताना मागे वळून व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे पाहिले. व्यासपीठावर भाजपचे दानवे आणि कराड हेही उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या विधानामधून शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याचेच तर संकेत द्यायचे नव्हते ना, याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे.
व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मातांनो आजचे हे व्यासपीठ आणि कार्यक्रम पाहून मला समाधान आहे की, आपण सगळेच जण राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या हिताच्या गोष्टी करीत आहोत, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री मनातले बोलले : फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात कधी काहीही होते. आम्ही एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहोत तसेच ही जी अनैसर्गिक आघाडी तयार झाली आहे ती फार काळ टिकत नाही, हे मुख्यमंत्र्यांच्यादेखील लक्षात आले असेल. म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली.
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, पण आज ते मला दिसत नाही. स्पष्टपणे सांगतो, भाजप सरकार बनवण्याच्या मानसिकतेत नाही. भाजप महाराष्ट्रातील लोकांच्या अपेक्षा घेऊन आंदोलन करीत आहे. भाजप सरकारला उत्तरदायित्व शिकवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा एवढाच अर्थ निघतो की त्यांच्या लक्षात आलंय की ते कशा प्रकारच्या लोकांसोबत सरकार चालवत आहेत. भ्रष्टाचार होत आहे. हे सगळे मुख्यमंत्र्यांना समजले असेल. त्यामुळे आपण त्या शुभेच्छा समजूया.
राजकारणात काहीही घडू शकते -दानवे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या विधानावरून त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांची तयारी असेल तर भाजप शिवसेनेसोबत एकत्र यायला केव्हाही तयार असल्याचे दानवे म्हणाले.
शिवसेना-भाजप हे समविचारी पक्ष आहेत. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी ही युती घडवून आणली आणि गेली 25-30 वर्ष आम्ही एकत्र काम केले. राजकारणात काहीही घडू शकते. अशी एक घटना राज्यात घडली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेससोबत घरोबा केला, मात्र संसारात काहीतरी घडल्याशिवाय असे बोल माणूस बोलत नसतो. बाळासाहेब थोरातांसमोर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक जर मला त्रास द्यायला लागले, तर मी भाजपला बोलवून घेतो. या एकदा, आपण बसून बोलू. ते कधी मैत्रीत बोलतात, कधी भाषणात. या गोष्टी चालत असतात, असेही दानवे यांनी सांगितले.

उद्या भाजपसोबत जायचे झाले, तर माझी तयारी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हणायचे असावे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कुरघोड्यांचे राजकारण करू नये. मला भाजपसोबत जाण्याचा पर्याय खुला आहे, हा संदेश देण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असावा.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषद

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply