Breaking News

कोरोना रुग्णांसाठी 200 बेड उपलब्ध करून द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कामोठे एमजीएम हॉस्पिटलमध्ये 200 बेड उपलब्ध करून या रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पनवेलमधील वैद्यकीय खासगी हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे एमजीएम हॉस्पिटल सोयीसुविधांनी सुसज्ज असे असून तेथे कोरोना रुग्णांसाठी महापालिकेमार्फत किंवा शासनामार्फत 200 बेडची व्यवस्था झाल्यास पनवेल महापालिका हद्दीतील रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यास मदत होईल. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असून, काहींना अतिशय तुटपुंज्या वेतनावर तसेच उद्योगधंदा सुरळीत नसल्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशातच एकाच कुटूंबात दोन-तीन कोरोना रुग्ण आढळत आहेत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आकारण्यात येणारा खर्च न परवडणारा असल्याने रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने शासनामार्फत उपचार होणे गरजेचे आहे.
या वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित करून पनवेल महापालिका हद्दीतील रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यासाठी महापालिकेला कामोठे एमजीएम हॉस्पिटलमध्ये 200 बेड उपलब्ध करून या रुग्णांच्या उपचारासाठी होणारा खर्च महापालिकेमार्फत किंवा शासनामार्फत करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply