कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील कोदिवले गावातील आशा अनंत राणे या तरुणीने आपल्या फेसबूक अकाऊंटवरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. याबाबत आंबेडकर अनुयायांनी नेरळ पोलीस ठाणे येथे शेकडोंच्या संख्येने जमून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, त्या तरुणीविरूद्ध समाजात भावना भडकावून वातावरण दूषित करणे आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दुषणे देणेबद्दल गुन्हा दाखल केले आहेत.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील कोदिवले गावात राहणार्या आशा अनंत राणे या तरुणीने आपल्या फेसबूक अकाऊंटवरून 24 जून रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर 30 जुलै रोजी त्या पोस्टचे स्क्रीन शॉर्ट रायगड जिल्ह्यात व्हायरल झाले. त्यामुळे भावना दुखावलेल्या आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्त्यांनी नेरळ तसेच कर्जत पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी मारुती गायकवाड, राहुल डाळिंबकर, धर्मानंद गायकवाड, धर्मेंद्र मोरे, अॅड. उत्तम गायकवाड, अरविंद मोरे, सुमित साबळे अशा नेत्यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडले. डिकसळ येथील किशोर गायकवाड यांनी आक्षेपार्ह पोस्ट तयार करून ती सोशल मीडिया वरील अकाऊंट वरून व्हायरल करणार्या आशा अनंत राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. त्यावेळी नेरळ पोलीस ठाणे बाहेर 400हून अधिक लोकांची गर्दी जमली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कर्जतचे पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठून प्रकरण समजून घेतले. त्यानंतर तरुणीवर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश नेरळ पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांना दिले. कर्जत पोलीस ठाणे येथेदेखील याच प्रकारावरून तक्रार देण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper