Breaking News

बाप्पाला रायगडात भावपूर्ण निरोप…

म्हसळ्यात गणेश विसर्जन

म्हसळा : प्रतिनिधी

नऊ दिवस मुक्काम केल्यानंतर रविवारी म्हसळा शहरातील व तालुक्यातील सुमारे 640 गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पांना ढोल ताशांच्या गजरांत व फटाक्यांच्या आतषबाजीत निरोप देण्यात आला. म्हसळा शहरात वंजारा समाजाचा एकच गणपती सार्वजनिक होता व बहुतांश गणपती खाजगी असल्याने कुटुंबातीत महिला, लहानमोठी मुले मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होती. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुर्वे यांनी दोन आधिकारी व 25 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले होते.

कर्जतमध्ये 1120 गणरायांचे विसर्जन

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यात रविवारी (दि. 19) अनंत चतुर्दशीच्या एकूण 1119 गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. भाविकांनी नदी तसेच गावाजवळ असलेल्या तलाव व ओढ्यांमध्ये गणरायांचे विसर्जन केले. तालुक्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ सार्वजनिक आणि 423 खाजगी, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 663 खाजगी आणि माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 25 खाजगी अशा एकूण 1119 गणेशमूर्तींचे ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात विसर्जन करण्यात आले. कर्जत नगर परिषदतील दहिवली, मुद्रे बुद्रुक, मुद्रे खुर्द, आकुर्ले गावातील भाविकांनी आपापल्या गणेश घाटांकर जाऊन गणरायांचे विसर्जन केले. गुंडगे आणि भिसेगाव येथील भाविकांनी कर्जतमधील गणेश घाटावर येऊन आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी विसर्जन करण्यात येणार्‍या कर्जत पोलीस ठाण्यातील गणरायाचे विसर्जन रविवारी इतर सर्व सार्वजनिक गणरायांच्या आधी करून एक वेगळा पायंडा वरिष्ठ निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी सुरू केला. त्यांच्यासह सहाय्यक निरीक्षक राजू आल्हाट, संदीपान सोनवणे, सुनीता आथणे, राजेंद्र मांडे, प्रशांत देशमुख आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

माणगाव तालुक्यात गणरायाला निरोप

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यात 10 दिवसांच्या गणरायाला अनंत चतुर्दशीला रविवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. माणगाव तालुक्यात विशेष करून ग्रामीण भागात अनेक गणेशभक्तांनी वाजत, गाजत, नाचत गणरायांची विसर्जन मिरवणूक काढली होती. माणगाव नगरपंचायत हद्दीतील गणेशभक्तांनी वाहनातून व हातगाडीवरून गणराय नेऊन काळ नदी पात्रात विसर्जन केले. गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी काळ नदी पात्रात नगरपंचायतीचे कर्मचारी तैनात होते. या वेळी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सुधागडात बाप्पांना भावपूर्ण निरोप

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी रविवारी (दि. 19) 10 दिवसांच्या बाप्पांना साश्रू  नयनांनी निरोप देण्यात आला. यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करून गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात बाप्पाला निरोप दिला. या वेळी पालीचे पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply