प्रवीण सकपाळ अध्यक्षपदी
कर्जत ः बातमीदार
माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. माथेरानमधील क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष प्रवीण सकपाळ यांची भाजप शहर अध्यक्ष, तर किरण चौधरी, सुभाष भोसले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
माथेरान शहरातील हॉटेल गार्डन व्ह्यू येथे झालेल्या सभेत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, सरचिटणीस राजेश भगत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये तालुका खजिनदारपदी तत्कालीन शहराध्यक्ष विलास पाटील यांची, तर सरचिटणीसपदी राजेश चौधरी, चिटणीसपदी शैलेंद्र दळवी आणि संजय भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मराठा समाजाचे अध्यक्षपद भूषविलेले प्रवीण सकपाळ यांचा जनसंपर्क चांगला असून याचा फायदा येणार्या निवडणुकीत भाजपला नक्की होईल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत, तर उपाध्यक्ष किरण चौधरी यांचे प्रत्येकाबरोबर सलोख्याचे संबंध असल्याने भाजपला उभारी मिळण्यास मदत होईल, असेही बोलले जात आहे. या शहर कार्यकारिणीत सदस्य म्हणून माजी नगरसेवक प्रदीप घावरे, कुलदीप जाधव, अरविंद शेलार, तसेच सचिन दाभेकर, दीपक शहा, भद्रेश शहा, अनिल गुप्ता, बाबू बर्गे, सुजय भोसले, माजी नगरसेविका संध्या शेलार, मनीषा पाटील यांचाही समावेश करण्यात आला आहे.