मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हेविवेट गटात समाविष्ट झाल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. अर्थात ही लढाई भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेच जिंकणार हे निर्विवाद आहे. फक्त वातावरणनिर्मिती झाली म्हणजे मावळ आपला झाला असे विरोधकांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम ठरावा.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या अंतिम आठवड्याला आता प्रारंभ झाला आहे. या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात मावळ मतदारसंघाचा समावेश असल्याने सार्यांच्याच नजरा आता मावळकडे लागल्या आहे. हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून आतापर्यंत तो शिवसेनेकडेच आहे. अर्थात शिवसेनेच्या या यशात भाजपचीही साथ असल्याने शिवसेनेचा भगवा या मतदारसंघात नेहमीच डौलाने फडकत राहिलेला आहे. हा फडकणारा भगवा या वेळीही असाच फडकत ठेवण्याचा निर्धार शिवसेना, भाजप, रिपाइं मित्रपक्षांनी केला आहे. या वेळच्या निवडणुकीला वेगळी झालर आहे. कारण या वेळी राष्ट्रवादीने पार्थ पवार या नवख्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविलेले आहे. पार्थ मतदारसंघासाठी नवा असला, तरी त्याच्या पवार आडनावामागे मोठे वलय असल्याने राजकीयदृष्ट्या हा मतदारसंघ सर्वात हेविवेट ठरू लागलाय. कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा राजकीय वारसदार कितपत यशस्वी ठरतोय यावर देखील राष्ट्रवादीचे भवितव्य ठरणार आहे. अर्थात शिवसेनेने अनुभवी श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा एकदा मावळच्या आखाड्यात उतरविलेले आहे. त्यांना या वेळी भाजपची भक्कम साथ मिळत आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर कितीही पवार उभे ठाकले तरी ते टिकाव धरू शकणार नाही हे दिसून येईल. पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या या मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी खूपच वेगळी आहे. घाटमाथा आणि कोकण असे हे संमिश्र वातावरण येथे आहे. घाटमाथ्यावरील मतदारसंघात भाजप, शिवसेनेचे पूर्ण बहुमत आहे, तर पनवेल, उरणमध्ये भाजपचे पूर्ण प्राबल्य आहे. त्याचा फायदा बारणे यांना नक्कीच होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात केलेला विकास आणि भविष्यात करावयाचा विकास या जोरावर बारणे हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. या मतदारसंघात सुज्ञ मतदार असल्याने ते निश्चितच देशाच्या भवितव्याचा विचार करून आपले बहुमोल मतदान बारणे यांना करून देशाची सुत्रे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सुपूर्द करतील यात तीळमात्र शंका नाही. त्यामुळे बारणेंच्या रूपाने पुन्हा एकदा भगव्याचा सच्चा शिलेदार संसदेत प्रवेश करणार आहे. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबीय प्रचारात उतरले आहे, पण काळ बदलत चाललायं. घराणेशाहीला मतदार आणि कार्यकर्तेच विरोध करू लागले आहेत. आयुष्यभर पक्षासाठी काम करायचे आणि ऐन वेळी असे नवखे घराण्यातले उमेदवार द्यायचे याला कार्यकर्तेच विरोध करीत आहेत. त्याचा फटका पार्थ पवार यांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात हे जरी खरे असले, तरी निवडणूक आहे हे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेऊन अखेरच्या क्षणापर्यंत चौकीदारासारखे जागे राहणे गरजेचे आहे. जराही दगाफटका होणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यावी. यानिमित्ताने एवढेच सांगणे.