माणगाव : प्रतिनिधी
युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाड तालुक्यातील काळीज आदिवासीवाडीमधील पूरबाधित कुटुंबांना नुकताच हायजिन किट आणि ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनाही शालोपयोगी साहित्य देण्यात आले.
बॅक टू होम ही संकल्पना घेऊन युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी पुन्हा एकदा मदतकार्य सुरू केले आहे. त्याची सुरुवात सोमवारी महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांच्या प्रमुख उपस्थितीत काळीज आदिवासीवाडी येथे करण्यात आली. या कार्यक्रमात प्रत्येक बाधित कुटुंबाला हायजिन किट आणि ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. शाळकरी मुलांना वह्या, पुस्तके, दप्तर आणि इतर शिक्षणोपयोगी वस्तू देण्यात आल्या, तसेच परिसरातील आंगणवाडी आणि शाळांना चित्रकलेचे साहित्य आणि वेगवेगळ्या खेळांच्या सामानाचेदेखील वाटप करण्यात आले.
या वेळी युनिसेफच्या प्रतिनिधी अपर्णा कुलकर्णी, सीएसीआरचे नितीन वाधवानी, सुवर्णा घाडगे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांतर्फे आतापर्यंत महाड तालुक्यातील काळीज आदिवासीवाडी, आसनपोई बौद्धवाडी आणि दादली गावांमधील 200 पेक्षा जास्त पूरबाधित कुटुंबांना मदत करण्यात आली आहे. पुढील दिवसात 30-40 गावांत हे मदतकार्य करण्यात येणार आहे. आई कनकाई सामाजिक संस्था (माणगाव) आणि हरित क्रांती संघटना (महाड) यांचे या उपक्रमासाठी योगदान मिळत आहे. संस्थेचे सुशील कदम, संघटनेचे राजेंद्र कडू आणि त्यांचे सहकारी या भागातील पूरग्रस्तांविषयी माहिती गोळा करून प्रत्येक गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.