उरण, चिरनेर ः प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात गाजलेल्या 25 सप्टेंबर 1930च्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतीदिन शनिवारी (दि. 25) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने झाला. या वेळी पोलिसांनी बंदूकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना दिली.
चिरनेर जंगल सत्याग्रहात ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), रघुनाथ मोरेश्वर शिंदे (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तर अनेक जण जखमी झाले. या हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी चिरनेर येथे हुतात्म्यांचा स्मृतीदिन होत असतो.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांना पुढील कार्यक्रमासाठी पनवेल येथे जायचे असल्याने त्यांनी सकाळच्या सत्रात हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी इतरांनी अभिवादन केले. या कार्यक्रमास जि. प. अध्यक्ष योगिता पारधी, माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जि. प. सदस्य बाजीराव परदेशी, पं. स. सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, गटविकास अधिकारी नीलम गाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत, सरपंच संतोष चिर्लेकर आदी उपस्थित होते.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …