Breaking News

सीकेटीमध्ये एनएसएस स्थापना दिन आणि कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) 52वा वर्धापन दिन व पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 24) सकाळी 11.30 वाजता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आभासी माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सचे सहयोगी प्राध्यापक तथा एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विष्णू जगन्नाथ भंडारे प्रमुख अतिथी वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस स्वयंसेवकांच्या राष्ट्रीय सेवा योजना गीताने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत ज्ञा. बर्‍हाटे यांनी उपस्थितांना संबोधित करीत महाविद्यालयाच्या सुवर्णमय कामगिरींचा मागोवा घेतला व राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची ध्येय-धोरणे आणि कार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची माहिती सांगून त्यांच्या कमवा आणि शिका व रयत शिक्षण संस्थेच्या स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ध्येय या संदेशाचा पुनरोच्चार केला.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच मुख्य अतिथी डॉ. विष्णू भंडारे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची इत्यंभूत माहिती दिली. यासोबतच राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले. याचबरोबर समाजातील बहुजन, शोषित, वंचित घटकांच्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याविषयीचे मंथन केले.

अतिथींच्या संबोधनानंतर महाविद्यालयातील साक्षी मोहिते व गौरी सुंबे या स्वयंसेविकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बाळासाहेब आघाव, प्रा. काकासाहेब ढवळे, राष्ट्रीय सेवा योजना रायगड जिल्हा (उत्तर) समन्वयक डॉ. बबन जाधव व अन्य प्राध्यापकवृंद, स्वयंसेवक, स्वयंसेविका उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, डॉ. योजना मुनीव, प्रा. आकाश पाटील, प्रा. अपूर्वा ढगे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती शिरसाठ या स्वयंसेविकेने केले, तर कार्यक्रम अधिकारी प्रा. सत्यजित कांबळे यांनी आभार मानले.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply