ममतादीदी, ही तर सुरुवात..निवडणुकीपर्यंत पक्षात एकट्याच राहाल : अमित शाह
मेदिनीपूर (प. बंगाल) : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या दौर्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस व सीएएममधील 11 आमदारांनी तसेच एका माजी खासदाराने शनिवारी (दि. 19) भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या महाभरतीनंतर शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. ही तर सुरुवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममतादीदी तुम्ही एकट्याच राहाल, असे
शरसंधान शाह यांनी साधले.
मिदनापूर येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात अमित शाह उपस्थितीत तृणमूलमधून बाहेर पडलेले सुवेंदू अधिकारी यांच्यासह 11 आमदार व एका माजी खासदाराने ‘कमळ’ हाती घेतले. या वेळी बोलताना शाह म्हणाले, आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपमध्ये आले आहेत. सर्व पक्षांतील चांगले लोक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. असे असताना ममतादीदी म्हणतात, भाजप लोकांना करायला लावते. दीदींना मी आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष बनवला ते पक्षांतर नव्हते का, असा सवाल शाह यांनी केला.
शाह पुढे म्हणाले, जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतील, तेव्हा 200पेक्षा अधिक जागा जिंकून भाजप सत्तेत आलेली असेल. बंगालच्या जनतेला आवाहन करताना त्यांनी सांगितले की, तुम्ही तीन दशके काँग्रेसला दिली. 27 वर्ष कम्युनिस्टांना दिलीत. 10 वर्षे ममतादीदींना दिलीत. भारतीय जनता पक्षाला पाच वर्षे द्या. आम्ही बंगालला सोन्यासारखे बनवू.