Breaking News

पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी मागे घ्यावी; पेण भाजप व मूर्तिकार संघटनेच्या वतीने पर्यावरण मंत्र्यांना निवेदन

पेण : प्रतिनिधी
पीओपी गणपती मूर्तीवरील बंदी मागे घेण्यासाठी पेण भाजप व मूर्तिकार संघटनेच्या वतीने केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. सेवा व समर्पण अभियानांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने शनिवारी खांदा कॉलनीतील चांगु काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, भाजप उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, युवानेते ललित पाटील, सचिन पाटील, अप्पा नाईक, महेंद्र पाटील, वासुदेव म्हात्रे, सूर्यहास पाटील यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन दिले. गणेशोत्सव मंडळासाठी मोठ्या मूर्ती तयार करताना प्लॉस्टर ऑफ पॅरिसचा वापर करावा लागतो. त्यावर बंदी आणल्याने पेणच्या गणेशमूर्ती बनवणार्‍या कलाकारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. प्रत्यक्षात गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, तर त्या रंगविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रंगामुळे प्रदूषण होते, असे या निवेदनात म्हटले आहे. पर्यावरण खाते सांगेल ते रंग आम्ही वापरण्यास तयार आहोत, त्यामुळे प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पीओपी गणेशमूर्तीवरील बंदी उठविण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे नियम असतील व इतर माहितीच्या आधारे चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधितांची बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या वेळी दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply