कर्जत : बातमीदार
तालुक्यातील नेरळ-ममदापूर-भडवळ रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. अतिवृष्टीमुळे या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचा मातीचा भराव वाहून गेला असून, रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथून प्रवास करणार्या ग्रामस्थांना पाठीचे आजार उद्भवू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी हा रस्ता नव्याने बनविण्याची मागणी केली आहे. नेरळ रेल्वेस्टेशनसमोरील जुन्या पोस्ट ऑफिस येथून नेरळ-ममदापूर रस्ता सुरू होतो. त्यापैकी जुने पोस्ट ऑफिसपासून कल्याण-कर्जत राज्यमार्गापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला आहे. पुढे हा रस्ता ममदापूर-भडवळ या दोन गावांना जोडला जातो. त्यातील ममदापूर हद्द ते भडवळ गावापर्यंतचा रस्ता चर्चेत आला आहे, तो त्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे. हा रस्ता खड्ड्यांनी सुरू होतो आणि भडवळ गावात संपतो तोदेखील खड्ड्यांमधूनच. त्यामुळे भडवळ गावातील लोकांनी हा रस्ता वापरणे जवळपास बंद केले आहे, तर पातळीचामाळ येथील ग्रामस्थांना पाठदुखीचे आजार उद्भवू लागले आहेत.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 10 वर्षांपूर्वी भडवळ गावातून टाकाचीवाडी येथे जाणारा रस्ता बनविला होता. त्यानंतर या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
-किशोर घारे, ग्रामपंचायत सदस्य
ममदापूर हद्दीतील रस्त्याचे काम नेरळ ममदापूर विकास संकुल प्राधिकरणच्या अखत्यारीत आहे. पुढे भडवळ गावाकडे जाणारा रस्ता खराब झाला आहे. ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे काम प्राधिकरणाकडून प्रस्तावित आहे.
-प्रल्हाद गोपणे, उपअभियंता, रायगड जि. प. बांधकाम विभाग