Monday , January 30 2023
Breaking News

पुनर्वसनाचा अपयशी पॅटर्न आता केवनाळे, सुतारवाडीतही?

पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केवनाळे येथे 22 जुलै 2021 रोजी दरड कोसळली. त्यात एकूण 11 जणांचे बळी गेले, आता तेथे पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात येत आहे. मात्र, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  मतांची बेगमी करण्याचे राजकारण होऊ घातल्यास 2005च्या दरडग्रस्त कोतवाल अन् कोंढवी पुनर्वसनाचा अपयशी पॅटर्नची केवनाळे व सुतारवाडी येथे पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

साखर सुतारवाडी येथे सहा तर केवनाळे येथे पाच जणांचा दरडीखाली बळी गेला. यापैकी केवनाळे गावाचा जिऑलॉजिकल सर्व्हे अहवाल वर्ग 1 मध्ये आला आहे.  पोलादपूर तालुक्यातील दाभिळ, हळदुळे, चिरेखिंड, वाकण धामणेची वाडी, कुडपण खुर्द व कुडपण बुद्रुक, किनेश्वर, खोपड, चांदके अशा सुमारे 18 गांवांमध्ये दरडीचा धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी दरडग्रस्तांचे मसिहा बनण्याची मानसिकता काही राजकीय नेतृत्वामध्ये तयार झाली आहे. सरकार आणि जनतेतील दुवा बनण्याऐवजी त्यांचे गोष्टीतील दोन माकडांच्या भांडणात खवा फस्त करणार्‍या बोक्यासारखे वर्तन होण्याआधी जनता आणि सरकारने आपसात समन्वय साधण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरडी हटविण्याच्या कामी पोकलेन, जेसीबी, डम्पर्स, रोडर, लोडर सारख्या अजस्त्र यंत्रसामुग्रीसोबत सरकारनेच डिझेल उपलब्ध करून दिले. या कामाची बिले सरकारकडून अदा केली जाणार आहेत. तात्पुरती निवास व्यवस्था म्हणून उभारण्यात आलेल्या कंटेनर केबिनची घरे उभी करण्यासाठी काँक्रीटचा बेसमेंट तसेच तात्पुरत्या निवारा शेडमधील वास्तव्यादरम्यान शौचालये उभारण्यासाठी जो तातडीचा खर्च केला जात आहे, त्यासाठी सरकारकडून दिला जाणारा निधीदेखील राजकीय पक्षांच्या प्रभावाने खर्च होत आहे. साखर सुतारवाडीतील 10 घरे पूर्ण बाधित असताना 44 घरांसाठी जमिनीचा शोध सुरू आहे तर काहींनी पोलादपूर शहरात होऊ घातलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांची मागणी केल्याची चर्चा घडवून काही परस्पर साध्य करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

केवनाळेसोबत आंबेमाची गावाच्या पुनर्वसन स्थलांतराची चर्चा सुरू असताना तेथे उपलब्ध जमिनीचे दर वाढविण्यापासून नवीन घरांमध्ये स्थलांतरीत झाल्यानंतरही सध्याच्या घरांच्या इमारतींमधील वास्तव्याची ऑफ दि रेकॉर्ड ग्वाही दिली जात आहे. जनता आणि सरकार यांच्यामध्ये दुवा असलेल्यांनी खवा खावा अशी परिस्थिती होऊ नये, याबाबत दक्षता कोणी घ्यायची. कोटक महिंद्रा बँकेने 100 घरे बांधून देण्याची तयारी दाखविली असली तरी या घरांचे स्वरूप कसे असावे, हे निश्चित करण्याची मानसिकता केवळ राजकीय पक्षनिहाय आधारित असण्याने यासाठी जमिनी उपलब्ध करून देण्यापासून त्यावर घरे बांधून देण्यापर्यंत तसेच अन्य सोयीसुविधांनी परिपूर्ण करण्याची कार्यवाही कितपत शक्य आहे, यासाठी पोलादपूर तालुक्यातील यापूर्वीच्या कोंढवी आणि कोतवाल येथील पुनर्वसन घरकुलांची सद्यस्थिती विचारात घेण्याची आवश्यकता आहे. यामध्ये वाटाघाटीचे काम करणार्‍या पाठिंबा प्राप्त राजकीय पक्षांना ठेकेदारीची कामेदेखील विनासायास मिळणार आहेत. याखेरिज, सामाजिक बिगरराजकीय यंत्रणांचा प्रभाव निर्माण करण्यापूर्वी राजकीय मानसिकतेशी प्रशासनाची लिनता पाहता श्रेयवादाचा पुरस्कार या सर्व पुनर्वसन कार्यातून होऊ शकत आहे.

2005 च्या अतिवृष्टी, महापूर आणि भूस्खलनानंतर ज्याप्रमाणे कोतवाल आणि कोंढवीतील पुनर्वसन घरकुलांचा लाभ देण्यासाठी घरपट्टीच्या उतार्‍याचे चार भाग करून एका बाधिताला चार घरे देण्याचा आभास निर्माण करून, बाधितांना या आमिषाला भुलविण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांना मतांच्या बेगमीसह बाधितांचा प्रचंड पाठिंबा प्राप्त करण्याची संधीही ठरली होतीे.

2005चे पुनर्वसन कसे रखडले होते

25 व 26 जुलै 2005च्या अतिवृष्टी, महापूर आणि भूस्खलनानंतर पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुकमध्ये सहा, कोतवाल खुर्दमध्ये तीन आणि लोहारमाळ-पवारवाडीमध्ये दोन जणांचा जमिनीत गाडले गेल्याने मृत्यू झाला. याखेरिज तालुक्यातील कोतवालसह कोंढवी गावामधील दरडग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आव्हान निर्माण झाले. पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात बोरावळे येथील नऊ घरांच्या बांधकामानंतर तेथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले. सावित्री महिला विकास संस्थेतर्फे पैठण गांवात तीन, देवपूर येथे चार, पार्ले येथे तीन, माटवण येथे पाच, जोगेश्वरी गाडीतळ येथे तीन, सडवली येथे सहा, लोहारमाळ येथे चार, रानबाजिरे येथे 23, आड येथे दोन, सवाद येथे एक आणि हावरे येथे सहा अशी एकूण 61 घरकुले बांधण्यात येऊन ताबाही देण्यात आला. पोलादपूरमधील चित्रे यांना घरबांधणीसाठी सरकारी अनुदान देण्यात आले.

कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी 28  तर कोंढवी येथे 29 घरकुले उभी राहतील एवढे क्षेत्र उपलब्ध करण्यात येऊन पुनर्वसनाचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले. सिध्दीविनायक ट्रस्ट, मुंबईने याकामी खर्चाची जबाबदारी उचलली. कोतवालमध्ये दरडग्रस्तांची संख्या 48 तर कोंढवी येथे 78 कुटूंबे अशी असताना दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 45 लाख रूपये खर्चातून केवळ 15-15 घरकुले उभारण्यात आली. गेल्या अनेक वर्षांत कोतवाल येथील घरकुलांपर्यंत जाणार्‍या रस्त्यासाठी भूसंपादन करण्याकामी तत्कालीन तहसीलदारांनी  कुचराई केली. त्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी सुभाष सोनावणे यांनी नाराजी उघड केली होती. दुसर्‍या टप्प्यात मिळालेली रक्कम झालेल्या कामापोटीच मिळाली असे सांगून ठेकेदार त्याठिकाणी फिरकेनासेही झाले. कोतवाल येथील घरकुले स्मशानभूमीमध्ये बांधण्यात आली आहेत तर कोंढवीतील घरकुले बांधण्यात आलेल्या जागेचा वाद उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने नजिकच्या काळात तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोतवाल आणि कोंढवी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी मतदारांना खुश करण्याच्या प्रयत्नात आपद्ग्रस्तांची संख्या कागदोपत्री वाढविण्यात आल्याने या दोन्ही पुनर्वसन प्रकल्पाची वासलात लागली.सर्व घरकुलांचे काम पूर्ण होऊनही हस्तांतरीत न झाल्याने घरकुलांची कौले, खिडक्या, भिंती यांचे खुपच नुकसान झाल्याने कोंढवीप्रमाणे कोतवालमधील घरकुलांचादेखील जिर्णोध्दार करण्याची गरज निर्माण झाली आहे.  रस्त्यासह कोणत्याही नागरी व मुलभूत सुविधा येथे उपलब्ध झाल्या नसल्याने आता तेथे झालेल्या अक्षम्य दूर्लक्षाच्या खुणा स्पष्ट दिसू लागल्या आहेत.

याआधीच्या रायगडच्या पुनर्वसन उपजिल्हाधिकारी डॉ. दिपिका भोसले यांनी सादर केलेल्या अहवालानुसार कोंढवी येथे 26 लाख 99 हजार 198 रूपये तर कोतवाल येथे 49 लाख 95 हजार 896 असे एकूण 76 लाख 95 हजार 094 रुपये पुनर्वसन कामी प्रस्तावित केले आहेत.

कोतवाल आणि कोंढवी गावातील दरडग्रस्तांना घरपट्टीच्या उतार्‍याचे चार भाग करून प्रत्येकी चार घरे देण्याचे आमिष दाखवून भुलविण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांनी केला होता. त्या पक्षांना मतांच्या बेगमीसह बाधितांचा प्रचंड पाठिंबा प्राप्त करण्याची संधी ठरली होतीे. आताही दरडग्रस्त झालेल्या साखर सुतारवाडी आणि केवनाळे गावातील पुनर्वसनाला आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुक कामांचा राजकीय खोडा बसण्याची चिन्हे दिसून येत आहे. त्यामुळे सोशल ऑडिटींगद्वारे या पुनर्वसन कामावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply