रोहे : प्रतिनिधी
शेतकर्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, यासाठी रोहा तालुका कृषी विभागाने चणेरा येथे नुकताच कृषी मेळावा आयोजित केला होता. या वेळी शेतीबाबतच्या विविध योजनांची माहिती देऊन तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी उपस्थित शेतकर्यांना शेतीचे उत्पन्न कसे वाढवावे याबाबत मार्गदर्शन केले.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेच्या माध्यमातून शेतकरी स्वतःचा विकास कसा करू शकतो, याविषयी मेळाव्यात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बिगर शेतकर्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थ्यांना या योजनेत 35 टक्के सबसिडी मिळणार आहे. लाभार्थ्यांला या योजनेत सहभागी होण्यासाठी स्वतःचे 10 टक्के भागभांडवल उभारावे लागणार असून उर्वरित 90 टक्के भांडवल बँकेच्या माध्यमातून उभे करावे लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करून स्वावलंबी बनू शकतो, असा विश्वास मेळाव्यात सहभागी झालेल्या शेतकर्यांनी व्यक्त केला.