Friday , September 22 2023

सराईत घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

10 तोळे सोने व कार जप्त; राज्यात एकूण 29 गुन्हे दाखल

पेण ः प्रतिनिधी
पेण शहरातील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट चिंचपाडा व रामवाडी येथील बिल्डिंगमध्ये घुसून घरफोडी करणार्‍या सांगली येथील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेले 10 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा कार ताब्यात घेण्यात आली आहे. या सराईत दरोडेखोरांवर राज्यात एकूण 29 गुन्हे दाखल आहेत.
7 जुलै रोजी दुपारच्या वेळेत पेण शहरातील चिंचपाडामधील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट व रामवाडी येथील साई सृष्टी अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये घुसून स्क्रु ड्रायव्हरच्या सहाय्याने दरवाजाची कडी तोडून घरात घुसून घरफोडी करणार्‍या सांगली येथील सराईत गुन्हेगार लोकेश रावसाहेब सुतार (वय 30) व अरुण वसंत पाटील वय (26) (दोन्ही रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबागच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अटक केली आहे. गुन्हेगार हे नगर, मुरबाड, कल्याण मार्गे पनवेलवरून पेण येथे चोरी करण्यासाठी दाखल झाले. त्यांनी चिंचपाडा व रामवाडी येथे रेकी करून वरील दोन्ही बिल्डिंगमधील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये घुसून घरफोडी केली. त्यांनी तीन लाख 29 हजार रुपयांचे 10 तोळे सोने चोरले. घरफोडी केल्यानंतर महाड, महाबळेश्वरमार्गे चोर सांगली येथे पळून गेले.
या घरफोडीचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागच्या पोलिसांची एक टीम मिरज, सांगली येथे रवाना झाली. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांच्या माहिती नुसार लिंगनूर गावात दोन दिवस दबा धरून तपास करत असताना सदर चोरांनी फिल्मी स्टाईलने घरांवरून उद्या मारीत पळण्याचा प्रयत्न केला व एका खंडर मध्ये जाऊन लपले. यावेळी अलिबाग पोलिसांनी सापळा रचून कसोशीने शोध घेऊन चोरांच्या मुसक्या आवळल्या.
अलिबाग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवीत अधिक तपास केला असता त्यांच्याकडून चोरी केलेले तीन लाख 29 हजार रुपयांचे 10 तोळे सोने व दरोड्यात वापरण्यात आलेली आठ लाख किंमतीची (एमएच 10 डीजी 6774) होंडा कार असे एकूण 10 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या दरोडेखोरांवर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 29 गुन्हे दाखल आहेत.
पेण येथे झालेल्या सदर घरफोडीचा तपास रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, पोलीस शिपाई लालासो वाघमोडे यांनी केला आहे. आपल्या आयुष्यभराच्या कष्टाचे सोन्याचे दागिने फक्त चार दिवसांत मिळाल्याने रायगड पोलिसांचे कौतुक होत आहे.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply