Breaking News

पालक गमावलेल्या बालकांना आणि एकल महिलांना मिळणार अर्थसहाय्य; कोविडच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपाचा निर्णय

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रात कोविडमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीतर्फे घेण्यात आला आहे, तसेच कोरोना संसर्गामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे अशा एकल महिलांनाही अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. महिला बालकल्याण समितीच्या शुक्रवारी (दि. 1) झालेल्या ऑनलाइन बैठकीत याला मान्यता देण्यात आली. महिला बालकल्याण समिती सभापती मोनिका महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महिला बालकल्याण समितीच्या सदस्य नगरसेविका, तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या वेळी पती निधनानंतर एकल महिलांना ‘विधवा’ म्हणून संबोधले जाते. अशा शब्दातून त्यांचा अवमान व उपेक्षा केली जाते. म्हणून यापुढे विधवा असा शब्दप्रयोग न करता ‘विवाहित एकल महिला’ असे संबोधण्यात यावे, असा ठराव या वेळी करण्यात आला. पनवेल महापालिकेच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिला बालकल्याण विभागाने दोन महत्त्वाच्या विषयास मान्यता दिली. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात कोविडमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत मिळणार आहे. 12 मार्च 2020नंतर कोविड संसर्गामुळे ज्या बालकांचे एक पालक मृत्यू पावले आहेत अशा बालकांना 25 हजार रुपये, तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे, तसेच कोरोनामुळे ज्या महिलांचे पती निधन पावले आहेत अशा ‘एकल’ महिलांना 50 हजार रुपयांचे अर्थसाह्य मिळणार आहे. यासाठी काही नियम व अटी लागू असणार आहेत. कोविडमुळे मयत झालेल्या एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यूच्या वेळी कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असणे गरजेचे आहे. कोविड 19मुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे सक्षम अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून उपचार घेऊन परतल्यानंतर पुनःश्च कोविड उपचाराकरिता रुग्णालयात दाखल असताना कोविड संसर्गामुळे मृत्यू झाला असल्यास त्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते. म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला असल्यास त्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळू शकते. यासाठी स्वतः मुले, त्यांचे संगोपन करणारे सध्याचे पालक किंवा संगोपन करणारी संस्था अर्ज करू शकेल. या अंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य हे लाभार्थी बालकांच्या नावाने मुदत ठेवीच्या स्वरूपात असेल.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply