मोहोपाडा ः प्रतिनिधी
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या निधीतून मोहोपाडा येथील तलावाच्या सुशोभीकरण अंतर्गत गार्डन व ओपन जीमसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र गार्डनसाठी बांधण्यात आलेल्या कम्पाऊंडचे 50 लोखंडी अँगल अज्ञात समाजकंटकांनी वाकवून नुकसान केले आहे. याबाबत गार्डनचे काम घेतलेल्या ठेकेदार शरद शिर्के यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोहोपाडा परिसरातील नागरिकांसाठी चांगल्या प्रकारचे गार्डन व्हावे, त्यांना आपल्या कुटुंबासह या गार्डनमध्ये वेळ घालवता यावा यासाठी आमदार महेश बालदी यांच्या निधीतून 30 लाखांचे गार्डन मंजूर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आपले स्वास्थ उत्तम राखता यावे यासाठी 10 लाख रुपयांची ओपन जीम मंजूर करण्यात आली आहे. या दोन्ही विकासकामांमुळे मोहोपाडा परिसरातील नागरिकांना चांगला फायदा होणार आहे, परंतु काही विघ्नसंतोषींना ही विकासकामे न पाहावल्याने त्यांनी गार्डन कम्पाऊंडसाठी उभारण्यात आलेले लोखंडी अँगल वाकवून नुकसान केले आहे. ही बाब भाजपचे वासांबे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल यांना ठेकेदाराने सांगितली, तसेच नुकसान करणार्या अज्ञात समाजकंटकांच्या विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमदार महेश बालदी यांच्या निधीतून मोहोपाडा परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत आहेत, पण काही जणांना ती पाहावत नसल्याने संबंधित व्यक्ती असली कृत्य करीत असल्याचा आरोप भाजपचे वासांबे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल यांनी केला आहे. विकासकामांमध्ये कुणीही राजकारण न आणता आपल्या परिसराचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या निधीतून मोहोपाडा परिसरातील नागरिकांना सुसज्ज गार्डन व ओपन जीम मिळणार आहे, मात्र भाजपच्या माध्यमातून होत असलेला विकास बघवत नसल्याने तलाव सुशोभीकरणातील गार्डनच्या कम्पाऊंडचे लोखंडी अँगल वाकवून विकासकामात अडथळा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. हे कृत्य करणार्यांचा मी निषेध करतो.
-सचिन तांडेल, अध्यक्ष, वासांबे जि. प. विभाग, भाजप