Breaking News

तटकरे कुटुंबीयांच्या भूलथापांनी विचलित होऊ नका -महेंद्र घरत; पं. स. सदस्य बिलाल कुरेशी यांची काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’

पेण : प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहे. यामुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भूलथापा, विकासकामांची खोटी आश्वासने देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याचा एककलमी कार्यक्रम तटकरे कुटुंबीय राबवित असून अशा भूलथापांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी शेलघर (ता. पनवेल) येथे केले. एका दिवसापूर्वी काँग्रेसचे नागोठणे येथील पंचायत समिती सदस्य बिलाल कुरेशी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, परंतु 24 तासांतच त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. काँग्रेस नेते शब्बीर पानसरे, नागोठणे शहर अध्यक्ष अशफाक पानसरे, युवा नेते सद्दाम दफेदार, पेण शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नाने कुरेशी यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सरफराज हाफिज, रमीझ दफेदार, आदिल पानसरे या वेळी उपस्थित होते. पुढे बोलताना महेंद्र घरत म्हणाले की, रायगड जिल्ह्यात विकासकामांचा बोजवारा उडाला असून रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हजारो तरुण बेरोजगारीला तोंड देत आहेत. अशा परिस्थितीत  महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र सहकारी पक्षांतील कार्यकर्ते आपल्या पक्षात कसे येतील व आपले वर्चस्व जिल्ह्यात कसे होईल याकडे लक्ष ठेवून आहेत. तटकरेंच्या भूलथापांना बळी पडलेले कार्यकर्ते काही दिवसांतच स्वगृही परतत आहेत तसेच राष्ट्रवादी सोडून दुसर्‍या पक्षात जात आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply