Breaking News

दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ, विद्यार्थ्यांना एनएमएमटी प्रवासात मिळणार सवलत

पनवेल मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

नवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत (एनएमएमटी) बसभाड्यात सवलत मिळणार आहे. पनवेल मनपाच्या गुरुवारी (दि. 18)झालेल्या सर्वसाधारण सभेत या ठरावास मान्यता देण्यात आली.

पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी कोरोनानंतर दोन वर्षांनी प्रथमच प्रत्यक्ष उपस्थितीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, सर्व प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर उपस्थित होते. या सभेत वर्ल्ड बॉडीबिल्डर स्पर्धेतील कांस्यपदक विजेते महामार्ग सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, क्रीडा प्रशिक्षक सुमा शिरूर आणि नीट परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणारी नवीन पनवेलमधील कार्थिका नायर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपमहापौर जगदिश गायकवाड यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे महापौरांनी जाहीर केले.

पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना एनएमएमटी उपक्रमांतर्गत बसभाड्यात सवलतीपोटी देण्यात येणार्‍या रकमेची प्रतिपूर्ति न केल्याने ही सवलत बंद करण्यात आली होती. आजच्या महासभेत ही रक्कम देण्यास मान्यता देण्यात आल्याने दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना एनएमएमटी उपक्रमांतर्गत बसभाड्यात सवलत मिळणार आहे. यासाठी त्यांनी महापालिकेकडे अर्ज करून आयडी घ्यायचे आहे.

महापालिकेच्या सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहनचालक यांच्या धुलाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून आता प्रती कर्मचारी 150 रुपये भत्ता मिळणार आहे. याचा फायदा 465 कर्मचार्‍यांना होणार आहे. महापालिकेला पाच वर्षे पूर्ण झाल्याने प्राथमिक शिक्षणावर शासनाकडून आता 50 टक्केच अनुदान मिळणार असल्याने उर्वरित खर्चासही मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या मालमत्तांच्या व पदपथावरील दिव्यांच्या देखभाल-दुरुस्ती व नुतनीकरणासाठीच्या खर्चासदेखील मंजुरी देण्यात आली.

पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील शौचालयामुळे तेथील नागरिकांना होणार्‍या दुर्गंधीच्या त्रासाबाबत नगरसेविका दर्शना भोईर यांनी लक्षवेधी मांडली होती. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

स्थायी समितीच्या निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागेवर परेश ठाकूर, महादेव मधे, राजश्री वावेकर, संतोष भोईर, निलेश बाविस्कर, दर्शना भोईर आदींची या सभेत निवड जाहीर करण्यात आली, तर महिला व बालकल्याण समितीच्या 12 नवीन सदस्यांच्या जागी आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, संतोषी तुपे, चारुशीला घरत, हेमलता म्हात्रे, अनिता पाटील, सुशीला घरत, पुष्पा कुत्तरवडे व इतरांची निवड जाहीर करण्यात आली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply