Breaking News

स्वतःच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

पनवेल ः वार्ताहर

स्वतःच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी मोटरसायकलवरून जाणार्‍या तरुणाचा सायन-पनवेल मार्गावर अपघाती मृत्यू झाल्याची घटना सीबीडी येथील खिंडीत घडली. प्रतीक दिलीप चेऊलकर (21) असे या तरुणाचे नाव असून, येत्या 27 एप्रिल रोजी तो विवाहबद्ध होणार होता, मात्र त्यापूर्वीच त्याचे अपघाती निधन झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

या अपघातातील मृत प्रतीक चेऊलकर हा तरुण नवीन पनवेल सेक्टर 13मधील ए टाईपच्या इमारतीत राहण्यास होता. येत्या 27 एप्रिल रोजी त्याचा विवाह असल्याने तो लग्नाची खरेदी आणि पत्रिका वाटण्याच्या गडबडीत होता. रविवारी सायंकाळी प्रतीक नवीन पनवेल येथून मोटरसायकलने ऐरोली येथे पत्रिका वाटण्यासाठी जात होता. 4.30 वाजण्याच्या सुमारास त्याची मोटरसायकल सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी-बेलापूर येथील खिंडीत आली असताना अज्ञात वाहनाची त्याला धडक लागली. त्यामुळे प्रतीक मोटरसायकलसह खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन काही वेळात त्याचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच सीबीडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रतीकचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रतीकला कुठल्या वाहनाने धडक दिली हे समजू न शकल्याने पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, प्रतीकचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले असताना त्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने त्याच्या मित्र-परिवाराकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातातील मृत प्रतीक चेऊलकर हा पनवेल येथून ऐरोली येथे मोटरसायकलवरून जात असताना त्याने हेल्मेट घातले नव्हते. या अपघातात प्रतीकच्या डोक्याला जबर मार लागल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याने हेल्मेट घातले असते, तर कदाचित तो वाचला असता, अशी प्रतिक्रिया पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply