Breaking News

लहान मुलांसाठी ‘कोवॅक्सिन’ला अद्याप परवानगी नाही!; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशातील 2 ते 18 वयोगटातील लहान मुलांच्या कोवॅक्सिन लसीला भारतीय औषध नियंत्रक मंडळाकडून (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी अद्याप मंजुरी दिलेली नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहे. या लसीला वापरासाठी मंजुरी मिळाल्याचे वृत्त मंगळवारी (दि. 12)
दुपारी माध्यमांनी दिले होते. त्यावर आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या की, या लसीची मूल्यमापन प्रक्रिया अद्याप सुरू असून कोविड-19 विषय तज्ज्ञ समितीच्या (एसईसी) चर्चेत काहीतरी गोंधळ झाल्याने याच्या मंजुरीची चर्चा सुरू होती. या लसीला अद्याप डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिलेली नाही. भारत बायोटेक कंपनीने या संदर्भातील क्लिनिकल ट्रायल्सचा डेटा केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला (सीडीएससीओ) सुपूर्द केला होता. या डेटाची सीडीएससीओ आणि विषय तज्ज्ञ समितीकडून (एसईसी) कसून तपासणी केली जात आहे. या तपासणीनंतर त्यांनी या लसीबाबत सकारात्मक शिफारस केली आहे, अशी माहिती भारत बायोटेककडून देण्यात आली आहे, पण या लसीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लहान मुलांच्या कोवॅक्सिन लसीसाठी मूल्यमापन सुरू आहे. या संदर्भात तज्ज्ञ समितीच्या चर्चेत काहीतरी गोंधळ झाला. भारतीय औषध नियंत्रक मंडळाने लसीला मान्यता दिलेली नाही.
-डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply