Breaking News

बहुप्रतिक्षित अयोध्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल

संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला, तर सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी पाच एकर जागा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अयोध्येमधील बहुचर्चित जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी (दि. 9) ऐतिहासिक निकाल दिला. त्यानुसार अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे, तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्यात येणार आहे. याबाबत केंद्र सरकार तीन महिन्यांत राममंदिर निर्मिती आणि व्यवस्थापनासाठी ट्रस्ट तयार करेल, तसेच अयोध्येत महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बनवण्यासाठी जागा दिली जाईल, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. या निकालाचे संपूर्ण देशभरातून स्वागत करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे की, सन 1856पूर्वीही हिंदू भाविक या जागेवर पूजा करीत होते. 1859 साली इंग्रजांनी येथे कुंपण घातल्याने खरा वाद सुरू झाला. या ठिकाणी पूजा थांबविल्यामुळे हिंदूंनी बाहेर चबुतरा उभारून पूजा सुरू केली. इंग्रजांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद सुरू केल्याचे न्यायालयाने सांगितले.

कोर्टाने म्हटले आहे की, केंद्र सरकारने तीन महिन्यांमध्ये यासंदर्भात एक ट्र्स्ट बनवून निर्णय घ्यावा. या ट्रस्टच्या व्यवस्थापनाचे तसेच मंदिरनिर्मितीचे नियम बनवावेत. विवादित जमिनीच्या आतील आणि बाहेरील हिस्सा ट्रस्टला दिला जावा. याशिवाय मुस्लिम पक्षाला पाच एकर पर्यायी जागा द्यावी. केंद्र सरकारने मुस्लिमांना 1993मधील अधिगृहित जमिनीमधून अथवा अयोध्येत कुठेही पाच एकर जागा द्यावी.

सर्वोच्च न्यायालयात 6 ऑगस्टपासून सलग 40 दिवस या प्रकरणी सुनावणी सुरू होती. 16 ऑक्टोबर रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आणि 9 नोव्हेंबरला कोर्टाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या महत्त्वपूर्ण खटल्यावर निर्णय देणार्‍या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायाधीश एस. एस. बोबडे, न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.

भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करा : पंतप्रधान मोदी

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाकडे कुणाचा जय किंवा पराजय या दृष्टीने पाहू नये. रामभक्ती असो किंवा रहीमभक्ती, हा क्षण आपल्या सर्वांसाठी भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करण्याचा आहे. मी देशवासीयांना शांतता, सद्भावना आणि एकता कायम राखण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. या निकालामुळे न्यायप्रक्रियेवरील सर्वसामान्यांचा विश्वास आणखी मजबूत होणार आहे. आपल्या देशाच्या हजारो वर्षे जुन्या बंधूभावाच्या भावनेनुसार 130 कोटी भारतीयांना शांतता आणि संयमाची ओळख करून द्यायची आहे, असेही मोदी म्हणाले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply