मुरूड : प्रतिनिधी
शहरातील शेगवाडा परिसरातील क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव अथवा ठराव शिवसेनेच्या काळात झालेला नाही, तो त्या पूर्वीच्या काळात झाला असून या घटनेशी आमचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा मुरूडच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. शहरातील शेगवाडा परिसरात क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलून निवासी झोन करण्यात आले आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्या संदर्भात नगराध्यक्षा पाटील यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. या वेळी उपनगराध्यक्ष नौसीन दरोगे, गटनेत्या मुग्धा जोशी, पाणीपुरवठा सभापती पांडुरंग आरेकर, मुख्याधिकारी पंकज भुसे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या 11 जुलै 1985च्या पत्रानुसार शेगवाडा परिसरातील खेळाचे मैदान रद्द करून ती जागा निवासी विभागात समाविष्ठ करण्याबाबत कलम 37 अन्वेय कार्यवाही सुरू करण्यात आली होती, परंतु ती कार्यवाही पूर्ण झालेली नाही. मात्र भूखंडाचे आरक्षण बदलण्याचा ठारव आमच्या कालावधीत झालेला नाही, असे नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी सांगितले. प्ले ग्राऊंड आरक्षण क्रमांकास काट मारून हिरव्या रंगाने डिलेटेड अॅण्ड इन्क्लुड इन रेसिडेंट झोन असे दर्शवण्यात आले आहे. याबाबत नगररचना विभागास आरक्षण वगळले आहे किंवा नाही हे कळावे यासाठी पत्रव्यव्हार करून अभिप्राय मागितला असल्याची माहिती नगराध्यक्ष पाटील यांनी दिली. शेगवाडा येथील मोरीवर नगर परिषदेचे पैसे खर्च झाले आहेत. त्यामुळे तातडीने हे बांधकाम तोडता येणार नाही, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले आहे. ही मोरी नगर परिषद तोडणार आहे, मात्र त्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. हा निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.