Breaking News

खोपोलीतील लव्हेज शाळेची दुरवस्था; भाजप युवा मोर्चा आक्रमक, मुख्याधिकार्‍यांना निवेदन

खोपोली : प्रतिनिधी

नगरपालिका हद्दीतील लव्हेज शाळेच्या दुरवस्थेबाबत भाजप व युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी बुधवारी (दि. 13) मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन जाब विचारला. या वेळी शिष्टमंडळाने त्यांना निवेदनही दिले. लव्हेज गावातील शाळा क्रमांक 8च्या छतावरील पत्रे वादळात उडाल्यामुळे, पावसाचे पाणी पडून वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. काही वर्गात दगड विटांचा खच पडला आहे. अशा या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे, असा मोठा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शाळा सुरू होऊन काही दिवस झाले, तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शाळेच्या छतावरील पत्रे बसवायचे काम दोन वेळा ठेकेदाराने केले होते, परंतु ते काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे युवा मोर्चाचे सरचिटणीस विनायक माडपे यांनी मुख्याधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले, तसेच संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी चर्चेदरम्यान करण्यात आली. दरम्यान, शाळेचे पत्रे तातडीने बसवण्यात यावे, असे आदेश मुख्याधिकार्‍यांनी नगर परिषदेच्या बांधकाम विभागाला दिले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी शिष्टमंडळाला दिले. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान खोपोलीतील पंत पाटणकर चौकात खाजगी बस अनधिकृतपणे पार्किंग केल्या जातात. त्यामुळे रहदारीस अडथळा येऊन अपघाताची शक्यता असल्याने, सदर खाजगी बसमालकांना नगरपालिकेच्या अधिकृत पार्किंग यार्डमध्ये गाड्या उभ्या करण्यास सांगावे, असे या शिष्टमंडळाने मुख्याधिकार्‍यांना सांगितले. भाजपचे शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंदुलकर, सरचिटणीस विनायक माडपे, शहर सचिव गोपाळ बावस्कर, सोशल मीडियाचे राहुल जाधव यांच्यासह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply